देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोर धरत आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक ही त्यातल्या त्यात सार्या देशाचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक ! एके काळचे देशातील सर्वांत मोठे राज्य आणि त्यामुळे या राज्यातील निवडणूक निकालावरून काही राजकीय सूत्रे सिद्ध केली जात होती, तसेच केंद्रशासनाचे स्थैर्य आणि त्याच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्यासाठी या राज्यातील राजकीय वातावरणाची छाप पडत होती.
दहा वर्षांपूर्वी उत्तराखंड हे नवे राज्य उत्तरप्रदेशच्या कुशीतून उदयास आले आणि उत्तरप्रदेश राज्याचा भौगोलिक आकार थोडा घटला. तरीही निवडणुकीच्या काळात या राज्याकडे पहाण्याचा जनतेचा दृष्टीकोन अद्याप पालटलेला दिसत नाही. काँग्रेस पक्षाची या राज्यावर वर्षानुवर्षे असलेली घट्ट पकड अलीकडील वर्षांत बर्यापैकी सैल झाली आणि मायावती यांच्या बसप पक्षाने स्वतःचे स्थान तेथे घट्ट केले आहे, असे म्हणता येते. जातीयवादाचे सूत्र या राज्यात वर्चस्व गाजवत आहे आणि त्याच्या आड कोणीच येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. अर्थात निवडणूक प्रचाराचे कर्मकांड पार पाडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते उत्तरप्रदेश राज्याकडे धाव घेत आहेत आणि या शर्यतीत भाजप मागे नाही, हे तो स्वतःच्या धोरणातून दाखवत आहे. असे करतांना पक्षातील दिग्गज नेते स्वतःच्या विचारांप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करत आहेत आणि त्यातून त्यांच्यातील मतभेद उघड होत आहेत. ‘नेते तेवढ्या विचारसरणी’ अशी सध्या भाजपमधील स्थिती आहे. पक्षात एकवाक्यता नाही, हे ओळखण्याइतपत वातावरण टोकाला गेले आहे. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ या घोषवाक्याचे कसोशीने पालन करत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या या घोषवाक्याला पक्षात किंवा पक्षाबाहेर कितपत समर्थन आहे, यावर अद्याप काही निष्कर्ष निघत नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ते पाहून देशभर जनचेतना यात्रा काढण्याचे ठरवून अडवाणी यांनी तशी ती पूर्णही केली. या यात्रेची सांगता दिल्ली येथे झाली, तेव्हा पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची शपथ घेतली. आज या गोष्टीला तीन महिने होऊन गेले. देशात निवडणुकांचे वातावरण आहे. तरीही या नेत्यांनी घेतलेल्या त्या शपथेचा मागमूसही नाही, हे पाहून अडवाणी संतप्त झाले. भाजपच्या नेतेमंडळींमधील हा असंतोष म्हणजे दुभंगलेली मने होय आणि राजकीय संघटनेमध्ये हे कितपत हितावह आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे.
भाजपमधील कलह !
उत्तरप्रदेशपुरते बोलायचे झाले, तर भाजपला अपराधीपणाची जाणीव ठेवून पाऊल उचलावे लागत आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रीमंडळातून भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलेले बाबूसिंह कुशवाह यांना भाजपने आश्रय देण्याचे ठरवले, त्यांना पक्षात घेतले आणि त्यांच्याकडे प्रचारप्रमुखाची धुराही देण्याचे ठरवले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने कुशवाह यांच्या निवासस्थानांवर धाडी घालून भाजपसमोर मोठा पेच निर्माण केला. अखेर आपल्यावरील आरोपांविषयी निर्णय येईपर्यंत भाजपचे सदस्यत्व रद्दबातल ठरवावे, अशी कुशवाह यांनी विनंती केली आणि ते भाजपपासून दूर राहिले. कुशवाह यांच्या भाजपमधील प्रवेशाला अडवाणी यांचा आक्षेप होता आणि त्यांनी संतापही व्यक्त केला होता. प्रचार कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी पक्षाध्यक्ष गडकरी यांनी दिल्ली येथे एका बैठकीचे आयोजन केले असता अडवाणी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आणि उत्तरप्रदेशमध्ये प्रचाराला जाण्यास चक्क नकार दिला. पक्षाध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद पक्षाच्या भवितव्याविषयी बरेच काही सांगून जातात. भ्रष्टाचार हे सध्या देशातील कळीचे सूत्र आहे. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराचा समर्थक आहे, हे आजपर्यंतच्या अनुभवातून सिद्ध होते. आता अपेक्षा रहातात त्या केवळ भाजपकडून ! तोसुद्धा व्यर्थ समज आहे. भ्रष्टाचाराला नको, तुमच्यातील मतभेदांना प्रथम आवर घाला, असेच या नेत्यांना सांगायची वेळ आली आहे. वर्षानुवर्षे कुरघोडी आणि मतभेद अशा संघर्षातून जाणार्या राजकारण्यांपासून सुटका करून घेण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ उभारणी, हाच पर्याय होय !
