जगाच्या इतिहासात जी काही अत्यंत अटीतटीची निर्णायक युद्धे झाली, शौर्य आणि पराक्रम यांबरोबरच कल्पनातीत डावपेच खेळून शत्रूला नामोहरम करणारी जी युद्धे झाली, त्यात प्रतापगडच्या युद्धाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ आणि उत्तुंग बुद्धीमत्तेचा साक्षात्कार घडला. आज शिवप्रतापदिनी शिवाजी महाराजांच्या या प्रतापाविषयीची माहिती येथे थोडक्यात देत आहोत.
लेखक : शिवशाहीर अरविंद दाढे (गुरुजी), पुणे.
शिवकालीन काळातील भीषण स्थिती
मोगल राजवटीत महंमद घोरीपासून गझनीपर्यंत सर्वांनी हिंदुस्थानला लुटले. येथील सामाजिक जीवन उद्ध्वस्त केले. हिंदूंची मंदिरे फोडली, हिंदु महिलांवर महाभयंकर अत्याचार झाले. भारतासारख्या शेतीप्रधान देशात गोमाता पूजनीय असतांना त्या गायींच्या कत्तली होऊ लागल्या. प्रजेला अन्न, वस्त्र, निवारा नाही आणि धर्मांतराशिवाय पर्याय नाही, अशी जनतेची अवस्था झाली. स्वधर्म, स्वभाषा आणि स्वसंस्कृती लोक विसरू लागले.
परिस्थिती पालटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प
हे सर्व रोखणार कोण ? या पराभूत मनोवृत्तीचा इतिहास पुसणार कोण, असा संभ्रम निर्माण झाला होता. यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व चित्र पालटण्याचा संकल्प केला.
शिवरायांना संपवण्यासाठी अफझलखानाची नियुक्ती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा हिंदूंच्या शत्रूला असह्य होऊ लागली. छत्रपती शिवरायांचा बंदोबस्त केला नाही, तर इस्लाम धोक्यात येईल, अशी भावना दिल्लीच्या मुघल बादशाहपासून निजामशाह, अदिलशाह यांच्या मनात निर्माण झाली. या प्रत्येकाची झोप उडाली. छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या प्रचंड कर्तृत्वामुळे विजापूरचा दरबार तर अधिकच अस्वस्थ बनला. विजापूरच्या दरबारात शिवरायांचा द्वेष करणारी बरीच मंडळी होती. त्यामध्ये मुस्तफाखान, अफजलखान, बडी बेगम हे त्रिकूट शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी धडपडत होते. त्यासाठी विजापूर दरबाराने प्रचंड ताकदीचा महाकाय प्रवृत्तीचा हिंदु धर्मद्वेष्टा अशा अफझलखानाची नियुक्ती केली.
अफझलखानाच्या हिंदुद्वेष्ट्या मानसिकतेची झलक
‘दीन दार बुत् शिकन’ आणि ‘दीन दार कुप्लशिकन’ म्हणजे ‘मी धर्माचा सेवक आणि काफिरांचा विनाशक आहे’, असे खान गर्वाने म्हणत असे.
अखेर शिवरायांनी अफझलखानाचा वध केला
अफझलखान धर्मांध तर होताच; पण अत्यंत विश्वासघातकीही होता. असा अफझलखान ३५ ते ४० सहस्र सैनिकांनिशी शिवरायांना संपवण्यासाठी वाईच्या दिशेने निघाला. दारूगोळा, शस्त्रास्त्रे, पागा, हत्ती, उंट, लहान तोफा, प्रचंड खजिना हे सर्व त्याच्या बरोबर होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भेटीची वार्ता सार्या जगभर पसरली. सर्वांचे डोळे प्रतापगडाकडे लागून राहिले होते. आता शिवाजी संपणार, या विचाराने सारे हिंदुद्वेष्टे खूश होते. दुसरीकडे तमाम हिंदू श्वास रोखून परमेश्वराला छत्रपती शिवरायांच्या विजयासाठी साकडे घालत होते. अखेर या युद्धात छत्रपती शिवरायांनी क्रूरकर्मा आणि विश्वासघातकी अफझलखानाचाच वध केला.
युद्धानंतरचे परिणाम
प्रतापगडच्या युद्धानंतर जगभरातील हिंदुविरोधकांना जरब बसली. छत्रपती शिवाजी महाराजांचा दबदबा प्रचंड वाढला. मंदिरे उद्ध्वस्त होण्याचे रोखले गेले. गोहत्त्या थांबली, धर्मांतराला आळा बसला. या सर्व गोष्टी हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत बहुमोल अशा आहेत. म्हणूनच प्रतापगडचा रणसंग्राम खर्या अर्थाने ‘हिंदु विजयदिन’ आहे. हीच खरी हिंदूंची दीपावली आहे.
