सांगली, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - प्रस्ताविक धार्मिक दंगली प्रतिबंधक विधेयक संसदेत पहिल्याच दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबरला मांडून ते संमत करण्याचा केंद्रशासनाचा कुटील डाव आहे. त्यासाठी त्या दिवशी देशभर एकाच वेळी धरणे, निवेदन, तसेच अन्य पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे सरचिटणीस अधिवक्ता धर्मेंद्र खांडरे यांनी दिली. ते अधिवक्ता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे रविवारी सायंकाळी पार पडला.
या वेळी अधिवक्ता खांडरे यांनी याविषयी आपापल्या भागातील खासदारांना ‘हा कायदा हिंदुविरोधी असल्याने विधेयकाच्या विरोधात भूमिका घ्या’, अशी पत्रे मोठ्या संख्येने नागरिकांनी पाठवावीत, तसेच अधिवेशन काळापर्यंत अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवावा, असे आवाहन केले. विधेयकाला भाजप पूर्णपणे विरोध करेल ! - आमदार सुरेश खाडे
या प्रसंगी भाजपचे आमदार श्री. सुरेश खाडे म्हणाले, ‘‘प्रस्तावित विधेयकाला भाजपचा विरोध आहे. खासदारांच्या माध्यमातून याला संसदेत तीव्र विरोध केला जाईल.’’
या परिषदेसाठी अधिवक्ता बाळासाहेब देशपांडे, अधिवक्ता बाळासाहेब रेठरेकर, अधिवक्ता वासुदेव ठाणेदार, अधिवक्ता शैलेंद्र केळकर, भाजपचे श्रीकांत शिंदे, मनपा स्थायी समिती सभापती श्री. मकरंद देशपांडे, प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडीलकर, मिरज शिवसेनाशहरप्रमुख श्री. विकास सूर्यवंशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. नितीन देशमाने, डॉ. भालचंद्र साठे, श्री. जनार्दन लिमये, कर सल्लागार श्री. अरविंद थत्ते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर, सौ. भारती बाडगी यांसह सांगली-मिरज परिसरातील ७० हून अधिवक्ते आणि हिंदु धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
