'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

संत झालेले साधक आणि त्यांचा सन्मान सोहळा यांविषयी जाणवलेली सूत्रे

‘कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी सनातनचे पाच साधक संत झाले. याविषयी साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना, सन्मान आणि कृतज्ञता सोहळ्याविषयीची सूत्रे अन् अनुभूती आज येथे देत आहोत.
कार्यक्रमाच्या विषयी मिळालेल्या पूर्वसूचना
१. सन्मान सोहळ्याला प.पू. डॉक्टर उपस्थित रहातील, असा विचार मनात येणे : कार्तिक शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२७.१०.२०११) या रात्री फलकावर कार्यक्रमाविषयीची सूचना लिहिल्यावर ‘उद्या
श्री. संदीप आळशी आणि डॉ. मुकुल गाडगीळकाका हे संत झाले आहेत, असे घोषित करतील’, असे वाटले. तसेच ‘या कार्यक्रमाला प्रत्यक्ष प.पू. डॉक्टर येणार आहेत’, असा विचार मनात आला.
- श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. ‘एका सभागृहात मध्यभागी प.पू. डॉक्टर बसले असून दोन्ही बाजूंनी पाच साधक बसले आहेत आणि त्यांचा सत्कार प.पू. डॉक्टर करत आहेत’, असे दृश्य स्वप्नात दिसणे : ‘२८.१०.२०११ या दिवशी मी झोपेमध्ये असतांना मला स्वप्नात एक दृश्य दिसले. एक मोठे सभागृह असून तिथे फुलांच्या माळा लावलेल्या आहेत. मध्यभागी प.पू. डॉक्टर बसले असून दोन्ही बाजूंनी कोणीतरी पाच साधक बसले आहेत. त्यांचा सत्कार प.पू. डॉक्टर करत आहेत. तो सोहळा पहातांना सगळीकडे चैतन्य पसरलेले दिसून माझ्यावर उपाय होत होते. मी त्या चैतन्यामधे मग्न होऊन आनंद अनुभवत होते. नंतर लगेच मला जाग आली. त्यानंतर कार्यक्रम बघतांना प्रत्यक्षात तोच भाग अनुभवायला मिळाला.’ - कु. रुक्मिणी खंडागळे, मिरज आश्रम
३. सन्मान सोहळ्याला प.पू. डॉक्टर उपस्थित राहून पुष्कळ जणांची नावे घोषित करतील, असा विचार मनात येणे : कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी सकाळी विभागातील प्रार्थनेच्या वेळी ‘आजच्या सन्मान आणि कृतज्ञता सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष प.पू. डॉक्टर येतील आणि पुष्कळ जणांची नावे घोषित करतील’, असा विचार मनात आला.’ - कु. शशिकला आचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४. श्री. गाडगीळकाका आणि श्री. संदीपदादा हे संत होतील, असे एक मास आधीपासून वाटणे : ‘सप्टेंबर २०११ या मासापासून मला सतत वाटत होते, ‘या दिवाळीला आपल्याला श्री. गाडगीळकाका आणि श्री. संदीपदादा हे संत म्हणून लाभणार आहेत.’ २८.१०.२०११ या दिवशी सकाळी सन्मान सोहळा असणार, हे समजल्यापासून ‘कोणीतरी आजी संत झाल्याचे घोषित होणार’, असे वाटले. हा कार्यक्रम पहातांना माझी भावजागृती होत होती. तसेच प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटत होती की, देव आपल्याला किती भरभरून देत आहे.’ - कु. संगीता जाधव, मिरज आश्रम
संत झालेल्या साधकांच्यासन्मान सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे
१. अनेक जिवांना दर्शन देण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी आधुनिकतेचा लाभ घेतल्याने कृतज्ञता वाटणे : प.पू. डॉक्टरांच्या भेटीसाठी बरेच जीव आसुसले होते. त्यांना दर्शन देण्यासाठी आधुनिकतेचा लाभ घेत प.पू. डॉक्टरांनी दर्शन दिले. तेव्हा त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली. त्यांच्या दर्शनाने एका पाठोपाठ शरणागतभावाने प्रार्थना झाल्या आणि सेवा भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय झाला. या आधी अशी स्थिती कधीच जाणवली नव्हती.’
- श्री. रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२. सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम पहातांना पाच साधक संत झालेले पाहून पुष्कळ आनंद होऊन भावजागृती होणे आणि ‘आपण याच क्षणी दिवाळी साजरी करत आहोत’, असे वाटणे : ‘२८.१०.२०११ या दिवशी संतांचा सन्मान सोहळा बघायचा आहे, असे कळल्यावर अतिशय आनंद जाणवत होता. नक्कीच कोणीतरी साधक संत झाले असतील, असे वाटत होते. कार्यक्रम पहातांना पाच साधक संत झालेले पाहून पुष्कळ आनंद झाला. तेव्हा भावजागृती होत होती. डोळ्यांतून अखंड अश्रू वहात होते. ‘आपण याच क्षणी दिवाळी साजरी करत आहोत’, असे वाटत होते. प्रत्यक्षात दिवाळीच्या आधीच्या दोन दिवसांत एवढा उत्साह जाणवत नव्हता. दिवाळी आहे, असे वाटत नव्हते; पण आज खरी दिवाळी आहे, असे वाटून अधिक उत्साह जाणवत होता.’ - कु. मेधा सहस्त्रबुद्धे, मिरज आश्रम
३. कार्यक्रम पहातांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नसणे : ‘या दिवाळीला घरी जाऊ नये, आपल्याला इथेच काहीतरी मिळणार आहे’, असे वाटत होते. कार्यक्रम पहातांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. तसेच ‘सर्वकाही मिळाले’, असे वाटून अतिशय आनंद झाला.’ - कु. मनिषा शिंदे, मिरज आश्रम
अनुभूती
१. ‘पाच साधक संत झाल्याचे समजल्यानंतर माझ्या मनाला आलेला थकवा आणि निरुत्साह जाऊन माझे मन एकदम हलके झाले. तसेच मला वेगळाच उत्साह जाणवला.’ - एक साधिका
२. प.पू. डॉक्टरांना बघताक्षणी ‘श्रीकृष्ण’, असा जप आतून चालू होऊन भावजागृती होणे आणि पू. मुकुल गाडगीळ याच्या सत्काराच्या वेळी अखंड अश्रू येऊन संध्याकाळपर्यंत भावावस्था टिकून रहाणे : ‘कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी सकाळी ‘लाईव्ह स्ट्रीम’द्वारे कार्यक्रम दाखवण्यात आला. त्यात प.पू. डॉक्टरांना बघताक्षणी ‘श्रीकृष्ण’, असा जप आतून चालू झाला आणि भावजागृती झाली. त्यानंतर एकेक संतांचा सत्कार चालू झाला. पू. मुकुल गाडगीळ याच्या सत्काराच्या वेळी अखंड अश्रू येत होते. ते कितीही आवरण्याचा प्रयत्न केला, तरी आवरता येत नव्हते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या चरणी सतत कृतज्ञता वाटत होती. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व जण अभिनंदन करत असतांनाही सतत भावजागृती होऊन कृतज्ञता वाटत होती. सर्व पाश सोडून साधनेत आल्यामुळे जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले. दिवसभर नातेवाईक आणि इतर साधक यांचे भ्रमणभाष येत होते. तेव्हाही डोळ्यांत कृतज्ञतेने पाणी तरळत होते. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत श्रीकृष्णाचा आतून नामजप होत होता. भावावस्थेतून बाहेर येऊच नये, असे वाटत होते. त्या दिवशी पुष्कळ थकवा आल्याने सेवा झाली नाही. - सौ. माधुरी गाडगीळ
(पू. गाडगीळकाका यांच्या आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
३. सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आरंभ झाल्यावर मन निर्विचार होणे : ‘२८.१०.२०११ या दिवशी सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आरंभ झाल्यावर माझे मन निर्विचार झाले. पूर्ण शरीरभर शहारे येत होते. कार्यक्रम चालू असतांना माझ्यावर उपाय होत होते. मला आनंद आणि शांती यांची अनुभूती येत होती. तसेच ‘कार्यक्रम संपूच नये’, असे वाटत होते. ‘आजच खरी दिवाळी साजरी झाली’, असे वाटत होते.’ - श्रीमती शीतल जोशी, मिरज
४. मन निर्विचार होणे : ‘मी सन्मान आणि कृतज्ञता सोहळ्याला जातांना स्थिर होतो. तसेच मी सर्वांमध्ये असूनही नसल्याचे जाणवत होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या कालावधीत माझे मन निर्विचार होते.’
- श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
नूतन संत आणि ६० टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले साधक यांची ती. अप्पाकाका यांना जाणवलेली सूत्रे
     कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी रामनाथी आश्रमातील ‘कृतज्ञता आणि सन्मान’ सोहळ्याच्या वेळी प.पू. डॉक्टरांनी पाच संत आणि ६० टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले सनातनचे २ साधक यांची अमूल्य अशी ‘दिवाळी भेट’साधकांना दिली. त्यानंतर प.पू. डॉक्टरांचे मुंबई येथील ज्येष्ठ बंधू ती. अप्पाकाका (आधुनिक वैद्य वसंत बाळाजी आठवले) यांनी संतपदाला पोहोचलेले अन् ६० टक्के पातळी गाठलेले साधक यांच्याशी दूरभाषवरून संवाद साधला. त्या वेळी संत आणि साधक यांनी सांगितलेली काही सूत्रे अन्
ती. अप्पाकाकांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. पू. कुवेलकरआजी
१ अ. मायेत असूनही प्रगती केली, हे कौतुकास्पद असणे
पू. कुवेलकरआजी : मी गेल्या ४० वर्षांपासून नामजप करत आहे. (त्यांनी १९९३ साली संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास प्रारंभ केला.) तरी इतरांच्या तुलनेत मला संत होण्यास पुष्कळ वर्षे लागली.’’
ती. अप्पाकाका : एका जीवनात संत होणे, हीच फार मोठी गोष्ट आहे. अनेक जन्म घेऊनही इतरांना ते साध्य होत नाही. मायेत असूनही तुम्ही प्रगती केलीत, हे कौतुकास्पद आहे.
२. पू. सदानंद (बाबा) नाईक
२ अ. प.पू. डॉक्टरांप्रमाणे सहसाधकांना सांभाळून घेऊन त्यांना साहाय्य करण्याची प्रेरणा पू. बाबा नाईक यांना मिळणे आणि आश्रमांचे बांधकाम केले, तसे समाज बांधण्याचे काम करण्यास आता प.पू. डॉक्टर सांगणार असल्याचे त्यांना ती. अप्पाकाकांनी सांगणे 
पू. सदानंद (बाबा) नाईक : मागील ३-४ मासांपासून मला आतूनच वाटू लागले की, प.पू. डॉक्टर जसे सर्व साधकांच्या चुका होत असल्या, तरी त्यांना प्रेमाने सांभाळून घेऊन अध्यात्माच्या प्रगतीपथावर घेऊन चालले आहेत, तसेच आपणही साधकांच्या चुका होत असल्या, तरी त्यांना सांभाळून घेतले पाहिजे. तसेच ‘त्यांच्या चुका सुधारण्यासाठी मी काय साहाय्य करू शकतो’, असा माझा विचार होऊ लागला. याविषयी कोणीही काहीही न सांगता आतूनच ही प्रेरणा निर्माण झाली आणि मी त्याप्रमाणे साधकांना साहाय्य करू लागलो.
ती. अप्पाकाका : तुम्ही आजवर सनातनच्या आश्रमांचे बांधकाम केले. आता प.पू. डॉक्टर तुम्हाला समाज बांधण्यास सांगतील.
३. पू. मुकुल गाडगीळकाका
३ अ. पू. गाडगीळकाका संत झाल्याचे पत्नीला सूक्ष्मातून दिसणे
पू. गाडगीळकाका : प.पू. डॉक्टरांनी एखाद्या विषयावर लिहिण्यास सांगितल्यावर आता आपोआप सुचते. विचार करावा लागत नाही.
ती. अप्पाकाका : ९-१० मासांपूर्वी सौ. अंजली गाडगीळ यांना तुम्ही संत झाल्याचे दिसले होते. मंदिरात कोणीतरी साधू बसले आहेत, असे त्यांना ध्यानात दिसले होते आणि नंतर जवळून पाहिले असता ते तुम्हीच होतात. त्यांना सूक्ष्मातून दिसलेली गोष्ट तुम्ही स्थुलातून खरी करून दाखवलीत.
४. पू. संदीप आळशी
४ अ. ग्रंथांचे अंतिम संकलन करतांना आपोआप सुचणे
पू. संदीप आळशी : ग्रंथांचे अंतिम संकलन करतांना आपोआप सुचते. पूर्वीसारखा आता विचार करावा लागत नाही. प.पू. डॉक्टरांनी सध्या आहे, तीच सेवा चालू ठेवण्यास सांगितली आहे.
ती. अप्पाकाका (सौ. अवनी (पू. संदीपदादांच्या सौभाग्यवती) यांच्याशी बोलतांना) : ‘‘तुमचे नाव ‘अवनी’ म्हणजे पृथ्वी; पण तुम्ही पू. संदीपला पृथ्वीवरच धरून ठेवले नाही. (मायेत अडकवले नाही.)
५. पू. अनुताई
५ अ. पू. अनुतार्इंचे मायेत न अडकणे कौतुकास्पद असणे
पू. अनुताई : पूर्वी मला वाईट शक्तींमुळे वाईट आणि भीतीदायक स्वप्ने पडत. आता स्वप्ने पडतात; परंतु ती तशी नसतात. त्यामुळे मनाला स्थिरता आली आणि शांतीही जाणवू लागली.
ती. अप्पाकाका : लग्न न करता राहिलात, संसारात किंवा मायेत अडकला नाहीत, हे खरेच कौतुकास्पद आहे.
६. ६१ टक्के आध्यात्मिक स्तर झालेले साधक
६ अ. श्री. माधव गाडगीळ
६ अ १. असे कुटुंब क्वचितच आढळत असणे : यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे देवद आश्रमातील लहान मुलांसाठी बालसंस्कार घेणे, त्यांना श्लोक, स्तोत्रे, इत्यादी शिकवून त्यांच्यावर संस्कार करणे आणि सांगतील ती सेवा करतात.
     त्यांच्या सौभाग्यवती सौ. माधुरी गाडगीळ यांच्याशी माझे दूरभाषवर संभाषण झाले. तेव्हा पुढील गोष्टी कळल्या.
ती. आप्पाकाका : तुमच्यामुळे सौ. अंजली गाडगीळ यांना प्रथम प.पू. डॉक्टरांची माहिती मिळाली.  तुमच्या सातत्यामुळे त्यांना प.पू. डॉक्टरांची अनुभूती आली आणि पूर्ण श्रद्धा बसली अन् त्या प.पू. डॉक्टरांच्या शिष्या बनल्या. मुलगा संत, सून जगातील अद्वितीय असे ज्ञान मिळवून संतपदाकडे मार्गक्रमण करणारी, पती ६० टक्के पातळी असलेले आणि अन्य कुटुंबीयही साधनेत असणे, असे कुटुंब क्वचितच आढळते.
६ आ. श्री. दिनेश शिंदे (६० टक्के पातळी)
६ आ १. मानसिक अवस्थेत झालेले पालट  
अ. खिस्ताब्द १९८५ पासून मी प.पू. डॉक्टरांसमवेत आहे; परंतु खिस्ताब्द २००७ पर्यंत नकारात्मक विचार येत होते. नंतर जरी विचार सकारात्मक होत गेले, तरी मन भरकटतच होते. गेल्या ३-४ मासांपासून मन स्थिर झाले आहे.
आ. ४-५ वर्षांपासून एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास दुसर्‍या दिवशी तोच पदार्थ आश्रमातील स्वयंपाकघरात केला जातो.
इ. पूर्वीच्या तुलनेत विचारांचे प्रमाण अल्प झाले असून नाम सतत चालू रहाते. तसेच मला सेवेतील आनंदही मिळू लागला आहे.
ई. पूर्वी अन्य विषयांच्या संदर्भात स्वप्न पडत; परंतु मागील ३-४ मासांपासून प.पू. डॉक्टरांशी संबंधित स्वप्ने पडतात.
६ आ २. ऐकण्याची क्षमता अल्प झाल्याने काही वेळा हानी होणे : सध्या श्री. दिनेश शिंदे यांचे ऐकू येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. मी (ती. अप्पाकाका) त्यांना विचारले, ‘‘त्यामुळे इतर विषय कळत नसल्यामुळे अंतर्मुखता वाढून लाभच झाला असेल ना ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘नाही. काही वेळा हानी होते. प.पू. डॉक्टर काय सांगतात, ते काही वेळा कळत नाही. त्यामुळे आता सहसाधकाला संगे घेऊन त्यांच्याकडे जातो. नाहीतर काहीतरी अर्धवट ऐकले जाते. तसेच साधनेच्या संदर्भात मार्गदर्शक काय सांगतात, हेही काही वेळा कळत नाही.’’
६ आ ३. हा टप्पा गाठण्यास उशीर झाल्याचे श्री. दिनेश शिंदे यांनी सांगणे
श्री. दिनेश : इतरांच्या तुलनेत पुष्कळ वर्षे साधनेत असूनही हा टप्पा गाठण्यास उशीर झाला.
ती. काका : याच जीवनात संत झालात, तर काळजीचे कारण नाही; कारण प.पू. डॉक्टरांमुळे पुढील काळात प्रती वर्षी ४ ते ५ टक्केही आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल, असे आहे. त्यामुळे तुम्ही अगदी संथ गतीने म्हणजे ५ वर्षांनी म्हणजे तुमच्या ५० व्या वर्षी संत झालात, तरी ते फार मोठे ठरणार आहे.’

गुरुमुखातून अमृतवाणी जाहली,
‘सनातनची ‘पंचरत्ने’ संतपदी पोहोचली !’

साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ।
आमच्याकडे होत असतो नेहमीच साजरा ।
कारण संतांच्या मध्येच आहे आमचा ‘बसेरा’ ।। १ ।।
     आजही लाभला आहे असाच एक क्षण ।
          पू. अनुताईला (टीप १) लाभले आहे संतपण ।
     जमले आहेत येथे सर्व देवतागण ।। २ ।।
प.पू. डॉक्टरांनंतर तुझेच नाम मुखावर ।
कारण तू नेहमीच लक्ष ठेवले माझ्यावर ।
अन् भरभरून प्रेम केले आम्हावर ।। ३ ।।
     दिधले देवाने फळ आज श्रमाचे (टीप २) तुला ।
     तुझ्यापेक्षा समष्टीलाच आनंद जास्त झाला ।
    पू. अनुताईसारखी संत दिली आम्हाला ।। ४ ।।
आश्विन शुद्ध तृतियेला (टीप ३) विचार हा स्फुरला ।
स्फुरल्यानंतर सत्वरी तो टिपून ठेवला ।
म्हटले लवकरच मिळेल वार्ता ही आम्हाला ।। ५ ।।
     साजरा होत आहे हा आनंद त्रिभुवनात ।
     सर्वच या क्षणाची वाट होते पहात ।
     गुरूंच्या कृपेने तो काळ आला क्षणार्धात (टीप ४) ।। ६ ।।
दिवाळीच्या दिवशी ही दिवाळी दुसरी ।
आनंदात होत आहे सर्वत्र साजरी ।
पाच साधक संत झाले आजच्या शुभदिनी ।। ७ ।।
टीप : देवाने सुचवलेली वाक्ये पू. अनुताईविषयी असली, तरी हे प्रतीकस्वरूप आहे. इतर चार संतांविषयीही सर्व तसेच आहे.
टीप १ : तसेच पू. कुवेलकरआजी, पू. बाबा नाईक, पू. संदीपदादा, पू. गाडगीळकाका
टीप २ : त्रासांशी लढा देणे
टीप ३ : २९.९.२०११ या दिवशी प्रकर्षाने विचार आला की, पू. अनुताई लवकरच संत होणार आणि लगेचच या ओळी सुचल्या; म्हणून त्या लिहून ठेवल्या. त्या वेळी असे वाटले की, ताई संत झाल्यावर काहीतरी लिहायचे, तर खूपच घाई होईल; म्हणून देवाने आधीच हे सुचवून ठेवले. केवळ शेवटची एक ओळ २८.१०.२०११ या दिवशी जोडली.
टीप ४ : प.पू. डॉक्टरांच्या मनात आले आणि सर्वांच्या प्रतिक्षेचा काळ संपला. साधनेचे हे वर्ष कधी, कसे गेले, हे कुणालाच कळले नाही.
यासाठी प.पू. डॉक्टर, तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी तितकी अल्प आहे. हे साधक संत झाल्यावर तुम्ही जरी म्हटले, ‘माझी आता काळजी मिटली’; पण त्यातून तुम्ही आम्हाला शिकवले की, सर्वकाही तुमच्यावर निश्चिंतपणे सोपवून केवळ प्रयत्न करत रहायचे. सर्वकाही तर तुम्हीच करत आहात. पुन्हा एकदा तुम्ही शब्दात ती शाश्वती दिली की, मी तुम्हा सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे.
तरी तुम्ही दिलेला प्रत्येक श्वास, तुम्ही दिलेला प्रत्येक क्षण, या सर्व संतांप्रमाणेच आम्हालाही तुमच्या चरणी अर्पण करता यावा, हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना !’
        - कु. युवराज्ञी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

धन्य आमुची गुरुमाऊली !
(प.पू. डॉक्टरांच्या दर्शनाने अनेक जन्मांची तृष्णा भागल्यासारखे जाणवले. श्रीकृष्णाच्या भेटीने गोपींना झालेला आनंद असा असावा, असे वाटले. संतांच्या सत्कार सोहळ्यानंतर प.पू. डॉक्टर त्यांच्याप्रती बोलल्यावर स्फुरलेल्या ओळी)
अश्रूंची झाली फुले ।
वृंदावनी कमलपुष्प फुलले ।। १ ।।
कृतज्ञताभावाने ओंजळ भरली ।
गुरुचरणी वाहून पावन झाली ।। २ ।।
धन्य आमुची गुरुमाऊली ।
परंपरा संतांची निर्मिली ।। ३ ।।
‘संतांच्या सहवासाने सगळ्यांचा उद्धार व्हावा’, हीच गुरुचरणी प्रार्थना !
    - सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi