'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘बेस्ट’ चालकांच्या चुकीच्या वर्तनामुळे वाहतुकीची समस्या वाढते !

मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) - सध्या मुंबई शहरातील वाहतुकीची समस्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांमध्ये बेस्ट बसगाड्यांच्या चालकांचे चुकीचे वर्तन हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. बस थांब्यापासून काही अंतरावर बसगाडी थांबवणे,
रस्त्यावर सरळ रेषेत गाडी न चालवता वारंवार रेषा ओलांडणे इत्यादींमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात; म्हणून ‘बेस्ट’च्या चालकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे गार्‍हाणे आज मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आले.
मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून आज त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. तेव्हा याचिकाकर्ते म्हणाले, ‘‘वांद्रे-वरळी समुद्रमार्ग जेथे संपतो, तिथपासून ते स्वामी विवेकानंद मार्गापर्यंत असलेला एकही सिग्नल वाहनचालकांकडून पाळला जात नाही. वाहने वेगाने चालवली जातात. विशेषतः त्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस दिसत नाही. उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणार्‍या रस्त्यावरच प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. ‘ब्रीच कॅण्डी’ रुग्णालयापासून पुढे गिरगावच्या दिशेने रस्त्याच्या दुतर्फा महागड्या गाड्या उभ्या केलेल्या असतात. त्यांच्या मालकांवर कारवाई होत नाही.
त्यामुळे येथील वाहतूककोंडी वाढते. विभागस्तरावर लक्ष घालून या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न होत नाही.’’ त्यावर शासनाचे अधिवक्ता नलवडे म्हणाले, ‘‘२ सहस्त्र ४८९ वाहतूक पोलीस मुंबईतील सर्व वाहतूक व्यवस्था सांभाळत असतात. मनुष्यबळाचा तुडवडा असल्यामुळे सर्वच ठिकाणी लक्ष घालणे शक्य होत नाही. वाहतुकीची समस्या सुटावी म्हणून विभागस्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्या समित्यांना या समस्या सांगणे आवश्यक आहे. शासनपातळीवर मनुष्यबळ वाढणे, आधुनिक साधनसामुग्री विकत घेणे, ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावणे आदी उपक्रम चालूच आहेत.’’ यावर न्यायमूर्ती शहा म्हणाले, ‘‘याचिकाकर्त्यानी विभागस्तरावरील समित्यांच्या सदस्यांशी चर्चा करून मार्ग काढावा आणि तो अहवाल १७ नोव्हेंबरला न्यायालयात सादर करावा.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi