| कु. नीरज कर्वे |
महालोकातून पृथ्वीवर जन्मलेला बालसाधक कु. नीरज कर्वे याचा आज आश्विन शु. पंचमी, कलियुग वर्ष ५११३ (१.१०.२०११) सहावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
येथे देत आहोत.
कु. नीरज कर्वे याला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. सनातनच्या संतांच्या सहवासाचा लाभ झाल्यावर कु. नीरजला सुचलेल्या प्रार्थनायेथे देत आहोत.
कु. नीरज कर्वे याला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
आषाढ शु. द्वितीया ते चतुर्थी/पंचमी, कलियुग वर्ष ५११३ (३ ते ५.७.२०११) या कालावधीत पू. सत्यवानदादा, पू. राजेंद्रदादा आणि पू. होनपकाका आमच्या घरी वास्तव्याला होते. त्यानंतर नीरजला सुचलेल्या प्रार्थना पुढे देत आहे.
अ. ‘हे श्रीकृष्णा, मी पुष्कळ चुका करून माझे स्वभावदोषांचे गाठोडे वाढवत आहे. मी माझ्या चुका तुझ्या चरणी अर्पण करतो. प्रतिदिन माझा अहंकार उफाळून येतो. तो तू तुझ्याजवळ ठेवून घे.’
आ. ‘हे श्रीकृष्णा, तू माझ्याकडून साधना करवून घेतोस, मला सर्व सुचवतोस आणि कौतुक मात्र माझे करतोस. यासाठी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
२. भाव
अ. वयाच्या ६ व्या वर्षी संतांकडून मिळणार्या प्रसादाचे महत्त्व जाणणे : तो शाळेतून घरी आल्यावर मी त्याला सनातनच्या संतांसाठी बनवलेले कशाय प्रसाद म्हणून दिले. त्यानंतर साय आणि साखर दिली. तेव्हा त्याने मला विचारले, ‘‘हाही प्रसाद आहे का ?’’ त्याने ते घ्यावे; म्हणून मी ‘‘हो’’ म्हणाले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आपल्याकडे जे आहे, ते सर्व संतांना द्यायला हवे, म्हणजे आपल्याला सगळे प्रसाद म्हणून मिळेल.’’
आ. पू. राजेंद्रदादांनी कौतुक म्हणून दिलेल्या भेटीकडे ‘प्रसाद’ म्हणून पहाणे आणि इतरांना ती वाटण्यासंदर्भात विचारणे : कु. नीरजने संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून त्यांचे अभंग म्हणून दाखवले. त्या वेळी पू. राजेंद्रदादांनी कौतुक म्हणून त्याला पेन्सिलींचे खोके दिले. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी प्रसाद म्हणून मित्रांना यातील एकेक पेन्सिल देऊ का ?’’
३. जिज्ञासू वृत्ती : एकदा नीरज मला म्हणाला, ‘‘आई, देवाचे पैसे कसे संपत नाहीत ? आपले कसे संपतात ?’’
४. कर्तेपणाविषयी श्रीकृष्णाचे मर्म जाणणे : श्रीकृष्णावरील एका चित्रपटात इंद्राने अतीवृष्टी केल्यावर श्रीकृष्ण म्हणतो, ‘भगवान गोवर्धन (पर्वत) आपले रक्षण करील.’ ते दृश्य पाहून नीरज म्हणाला, ‘‘गोवर्धन रक्षण करील’, असे श्रीकृष्ण म्हणतो; पण स्वतःच सर्वांचे रक्षण करतो.’’
५. चप्पलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे : खिस्ताब्द २०११ मध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेल्यावर मी त्याला सभागृहात जाण्यासाठी घाई करत होते. तेव्हा तो हात जोडून प्रार्थना करत होता. मी त्याला विचारले, ‘‘तू काय करत होतास ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी चप्पलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत होतो, ‘तुझ्यामुळे माझ्या पायांना दगड टोचले नाहीत. तूच मला इथपर्यंत आणलेस.’’
६. कट्टी-बट्टीच्या प्रसंगातही वर्गमैत्रिणीचे गुण पहाणे आणि स्वतःच्या दोषाविषयी चिंतन करणे : एकदा त्याच्या वर्गातील एका मुलीने (बालसाधिका कु. संजना हिने) त्याच्याशी कट्टी घेतली. त्याने पुष्कळ वेळा सांगितल्यावर तिने बट्टी घेतली. त्याच दिवशी घरी आल्यानंतर काही कारणामुळे त्याने माझ्याशी कट्टी घेतली आणि ‘तू ‘क्षमस्व’ म्हणालीस, तरच बोलीन’, असा हट्ट धरला. थोड्या वेळाने तो म्हणाला, ‘‘संजनामध्ये किती प्रेमभाव आहे ! माझ्यात अहं आहे. ‘तूू मला क्षमस्व म्हणावे’, अशी मी अपेक्षा केली.’’
७. हिंदु धर्माचा अभिमान असणे : श्रावण अमावास्या, कलियुग वर्ष ५११३ (२८.८.२०११) या दिवशी शाळेतून घरी आल्यावर नीरज आनंदाने मला म्हणाला, ‘‘परवा आम्हाला सुटी आहे.’’ ‘ही सुटी ईदसाठी आहे’, असे मी सांगितल्यावर त्याला राग आला. ‘मग आम्हाला उगाच सुटी दिली’, असे तो म्हणाला. त्याने पंचांगातील ‘रमझान ईद’ या शब्दावर फुली केली. ‘त्या दिवशी हरतालिकाही आहे’, असे सांगितल्यावर त्याने ‘हरतालिका’ या शब्दावर योग्य असल्याची खूण केली.
८. कपडे धुण्यासाठी साहाय्य करणे : एकदा नीरजने ‘मला कपडे धुवायला शिकव’, असा माझ्याजवळ हट्ट धरला. त्यानंतर प्रतिदिन तो मला कपडे धुण्यासाठी साहाय्य करतो. त्याला न सांगता मी कपडे धुतल्यास तो रुसून बसतो. एकदा कपडे धूत असतांना त्याला पुढील काव्य स्फुरले.
श्रीकृष्णबाप्पा आणि प.पू. डॉक्टर
श्रीकृष्णबाप्पा, श्रीकृष्णबाप्पा ।
किती सुंदर दिसे ।
डोक्यावरती मोरपीस असे ।। १ ।।
प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर ।
तुम्हीच आमचे सदैव गुरु ।
आम्ही आता तुमच्या चरणी राहू ।। २ ।।
प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर ।
आम्हाला संत बनवा ।।
आम्हाला आता मोक्ष द्या ।। ३ ।।
९. स्वतःचे नाव ‘श्रीकृष्ण’ ठेवले नसल्याने वाईट वाटणे आणि श्रीकृष्णभेटीची ओढ असणे : एकदा नीरज म्हणाला, ‘‘आई, तू माझे नाव ‘श्रीकृष्ण’ का ठेवले नाहीस ? माझी प्रगती झाली नाही, तर पुढच्या जन्मी तरी माझे नाव ‘श्रीकृष्ण’च ठेव. श्रीकृष्ण दोन असतात ना ? एक खरा श्रीकृष्ण आणि दुसरा मी. मला पुष्कळ दुःख होते की, मी खर्या श्रीकृष्णाला भेटलो नाही. मी मोक्षाला गेल्यावर तिथे खरा श्रीकृष्ण असेल ना ? तो कसा दिसत असेल ? मला त्याला भेटायचे आहे.’’ त्यानंतर त्याची भावजागृती झाली आणि त्याला पुढील काव्य स्फुरले.
प.पू. डॉक्टर आशीर्वाद ठेवा ना पाठीशी ।
प.पू. डॉक्टर (भगवान श्रीकृष्ण) तुम्ही किती चांगले ।
भक्तराज महाराज, तुम्ही किती चांगले ।।
यावेसे वाटे आश्रमात पुष्कळ दिवस ।
तुमच्याशी झोका खेळावासा वाटतो ।।
तुम्ही बसा झोक्यावर, मी देईन झोका ।
घेऊनी हात हाती, परम पूज्य आले चित्ती ।।
आश्रमात तुमची पूजा करावी ।
प.पू. डॉक्टर आशीर्वाद ठेवा ना पाठीशी ।।
- सौ. कल्याणी आणि श्री. प्रवीण कर्वे (कु. नीरजचे आई-वडील), पुणे
१०. वरील सूत्रांचे लिखाण करतांना कु. नीरजने व्यक्त केलेली कृतज्ञता : ‘प.पू. डॉक्टर, तुम्ही माझे एवढे लाड करता, तरीही मी पुष्कळ चुका करतो. त्यासाठी क्षमस्व ! हे श्रीकृष्णा, तू आम्हाला साधना करण्याची संधी दिलीस, त्याविषयी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’ - कु. नीरज कर्वे, पुणे
११. पुणे येथील साधकाला कु. नीरजच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
अ. ‘कु. नीरज सनातनच्या संतांसमवेत सहज आणि नैसर्गिकरित्या वागतो.
आ. त्याच्या बोलण्यात प्रगल्भता आहे.
इ. एखाद्या बालसाधकाचे पालक भेटल्यास तो आठवणीने त्यांची चौकशी करतो.’
- श्री. महावीर श्रीश्रीमाळ, पुणे