'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

दलवाइंच्या विधानांमागील रहस्य !

‘अण्णा हजारे यांची अटक ही केंद्रशासनाची घोडचूक होती’,    अशी उपरती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आणि खासदार हुसेन दलवाई यांना दीड मासानंतर झाली आहे. चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दलवाई यांनी अशी स्वीकृती देऊन एक प्रकारे काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे, असे काही जणांना वाटेल. प्रत्यक्षात मात्र हे विधान त्यांनी विचारपूर्वक केलेले आहे. ‘अण्णांचा रामदेवबाबा करू’, अशा वल्गना करणार्‍या काँग्रेसने ज्येष्ठ समाजसेवक श्री. हजारे यांना आंदोलनापूर्वीच अन्याय्य अटक करून हुकूमशाहीचे दर्शन घडवले होते.
या विरोधात देशवासियांचा उद्रेक झाला आणि काँग्रेसवाल्यांनी नमते घेत अण्णांना मुक्त केले. पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग यांनी मात्र ‘अण्णांवरील कारवाई योग्य होती’, असे सांगून कारवाईचे समर्थन केले होते. असे पंतप्रधान आणि अण्णांना अटक करण्याचा आदेश देणारे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना ‘ती घोडचूक होती आणि त्याविषयी त्यांनी क्षमायाचना करावी’, असे आपल्या वरिष्ठांना सुनावण्याचे धाडस दलवाई करतील का, हा आमचा प्रश्न आहे. तरच जनतेला वाटेल की, दलवार्इंनी झालेली उपरती ही त्यांची खंत आहे.
    काँग्रेसी भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध लढणार्‍या अण्णांची सुटका करावी, यासाठी जनतेला तिचा कामधंदा सोडून रस्त्यावर उतरावे लागले. त्यात वेळ आणि पैसा अपव्यय झाला. ही सर्व हानी काँगे्रसच्या अयोग्य निर्णयामुळे झाली; म्हणून त्यासाठी काँगे्रसने क्षमा मागितली पाहिजे. दुर्दैवाने राष्ट्रीय स्तरावर काँगे्रस तसे करील, असे वाटत नाही. काँग्रेसने वरिष्ठ स्तरावर जाणीवपूर्वक घोडचुका करायच्या आणि कनिष्ठ स्तरावर उलटसुलट वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करून त्यांची सहानुभूती मिळवायची, ही काँग्रेसची धूर्तनीती पूर्वीपासूनची आहे. दलवाई यांच्या ताज्या विधानातून पुन्हा तिचे दर्शन घडले आहे.
काँग्रेसचा निवडणुकीवर डोळा !
    काँग्रेसचे वागणे धोरणी असते, म्हणून दलवार्इंच्या विधानाचा रहस्यभेद केला पाहिजे. महाराष्ट्रात काँग्रेसला झालेली ही उपरती अण्णांवर झालेल्या अन्यायामुळे नाही, तर काही महिन्यांवर महाराष्ट्रात येऊन ठेपलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ‘अण्णांची अटक ही चुकीची होती’, असे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने अण्णांच्या अटकेचे समर्थन केल्यास येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात तिला मोठा फटका बसेल आणि कदाचित तिचे पानीपत होईल, अशी भीती राज्यातील काँग्रेसवाल्यांना वाटू लागली आहे. आधीच ‘राष्ट्रकुल’, ‘आदर्श’ आणि ‘टू-जी’ यांमधील भ्रष्टाचारामुळे काँग्रेसची इभ्रत मातीत मिळाली आहे. त्यात काँग्रेसचे पुण्यातील खासदार सुरेश कलमाडी यांची तिहारच्या तुरुंगात झालेली रवानगी, तर टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या प्रकरणी देशाचे गृहमंत्री चिदंबरम आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या गळ्यापर्यंत हे प्रकरण आलेले आहे. महाराष्ट्रात अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि इतर काँग्रेसजन यांनी भ्रष्टाचाराचे मोठे ‘आदर्श’ उभे केले आहेत. अशा वेळी एकदम दारूण पराभव होण्यापेक्षा जनतेची सहानुभूती मिळून थोडी तरी सत्ता टिकून रहावी, हा कुटील हेतू दलवार्इंच्या वक्तव्यांमागे आहे.
अण्णांची अपकीर्ती, हेच दलवाइंचे धोरण !
    काँग्रेसचे प्रवक्ता दलवाई यांना झालेली उपरती ही वरवरची आहे. त्यांनी ‘अण्णांनी जनलोकपालचा हट्ट सोडावा; कारण तो लोकराज्याला मारक आहे’, असे पुढे म्हटले आहे. लोकराज्याच्या रक्षणाचे कारण सांगून अण्णांची अपकीर्ती करणे, हा त्यामागील निखळ हेतू आहे. श्री. हजारे यांनी माहितीच्या अधिकाराचा कायदा आणण्याचा आग्रह (काँग्रेसच्या भाषेत हट्ट) धरल्यामुळेच आज देशभरात एकामागून एक अशी अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणे उघडकीस येत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. नुसती भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊन कामाची नाहीत, तर त्यांना शीघ्र आणि कठोर शिक्षा व्हावी म्हणूनच ते जनलोकपालाची ‘हट्टी’ मागणी करत आहेत. आता ही मागणी अण्णांची नाही, तर संपूर्ण देशवासियांचीही आहे, हे भ्रष्ट काँग्रेसने लक्षात घ्यावे. ‘आज जनलोकपाल कायदा असता, तर भ्रष्ट चिदंबरम तुरुंगात असते’, अशी मर्मभेदी प्रतिक्रिया श्री. हजारे यांनी दिली आहे.
काँग्रेसला सत्ताच्यूत करा !
    सांगायचे तात्पर्य, जनतेने दलवार्इंसारख्या कावेबाज, धूर्त आणि मुरब्बी राजकारण्याच्या विधानांवर भूलून जाऊ नये. श्री. अण्णा हजारे यांना अन्याय्य अटक करणारे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या सहस्रो आंदोलकांवर पाशवी लाठीमार करून राजबाला यांना ठार मारणार्‍या भ्रष्ट काँग्रेसला सत्ताच्यूत करणे, हीच खरी शिक्षा आहे. तशी शिक्षा आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देण्याचा निश्चय जनतेने केला पाहिजे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi