नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - अण्णा हजारे यांच्यावर चिखलफेक करणारे काँग्रेसचे वादग्रस्त नेते मनीष तिवारी यांनी संसदेच्या स्थायी समितीतून माघार घेतली आहे. नव्या समितीमध्ये आपल्या नावाचा विचार करून नये, असे त्यांनी पक्षाला कळवले आहे.
तिवारी यांनी अण्णांच्या विरोधात केलेल्या आश्लाघ्य विधानांविषयी अण्णांच्या सहकार्यांसह कॉंग्रेस नेत्यांमध्येही नाराजी होती. हजारे हे भ्रष्ट आहेत, असा आरोप त्यांनी केल्याने आंदोलकानी संताप व्यक्त केला होता. शेवटी त्यांनी अण्णांवर केलेले आरोप मागे घेऊन त्यांची क्षमा मागितली होती. अण्णांनी उपोषण मागे घेतले असले, तरी संसदेच्या स्थायी समितीमध्येही पालट करण्याची तयारी शासनाने केली आहे. या समितीतून वगळले जाण्याची भीती असल्याने तिवारी यांनी स्वत:च या समितीत न रहाण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थायी समितीतून माघार घेण्याविषयी बोलतांना तिवारी म्हणाले, ‘‘जनलोकपाल विधेयकात कोणताही अडथळा येऊ नये. वाद होऊ नयेत यासाठी मी स्वत:हून या समितीतून माघार घेत आहे. समितीची पुढील बैठक ७ सप्टेंबर या दिवशी होणार आहे.''
अण्णा हजारे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करणारे तिवारी यांच्या विरोधात पुढील आठवड्यात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अण्णांचे अधिवक्ता मिलींद पवार यांनी दिली आहे.