भारताच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनचे एक टेहळणी जहाज अंदमान-निकोबार बेटांजवळ वावरत असल्याचे दिसून आले आहे. हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात चीनच्या जहाजांची ये-जा वाढू लागल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. नौदलाच्या माहितीनुसार, चीनचे एक मोठे जहाज चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय समुद्रात घिरट्या घालत असल्याचे आढळले होते.
चिनी ड्रॅगनने भारताला विळखा घालण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालवला आहे. १९६२ मध्ये भारतावर हिमालयातील सीमेवर आक्रमण करून भारताची सहस्रावधी चौ. मीटर भूमी कह्यात घेतली; मात्र यातून चीनचे समाधान झालेले नाही. संपूर्ण भारत पादाक्रांत करण्याचेच चीनचे मनसुबे आहेत. अरुणाचल प्रदेशवर चीनने त्याचा हक्क असल्याचे सांगितलेच आहे. भारताला चारही बाजूंनी घेरण्याची सिद्धता चीन करत आहे. उत्तरेत पाकव्याप्त काश्मीरमधून पाकला जोडणारा महामार्ग बांधून, पूर्वेला अरुणाचल प्रदेशजवळ सैन्यांची जमवाजमव करून, दक्षिणेत आता अंदमान जवळ हालचाली वाढवून अन् श्रीलंकेशी मैत्री करून आणि पश्चिमेला पाकला साहाय्य करून चीन भारताला घेरत आहे. अशा वेळेला चीनला जशास तसे उत्तर देणारे राज्यकर्ते भारताकडे नाहीत. चिनी ड्रॅगन भारताला गिळंकृत करण्यापूर्वी राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांना सत्तेवर बसवण्याला पर्याय नाही !
