'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

धर्मनिष्ठ टिळक !

 आज लोकमान्य टिळक यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने टिळकांच्या धर्मनिष्ठेविषयी येथे जाणून घेऊया.
    राजसत्तेची भीती न बाळगता वा लाभाच्या पदावर डोळा न ठेवता लिहिणार्‍या या श्रेष्ठ संपादकाचा आदर्श ‘संधी मिळताच हिंदुत्व, हिंदु धर्म किंवा हिंदूंना जागृत करणार्‍या संघटनांवर दुगाण्या झाडणार्‍या’, आजच्या संपादकांनी घ्यावा असा आहे. लोकमान्यांच्या मृत्यूपत्रात कोकणातील मिळकत त्यांनी कुलदैवत लक्ष्मी-केशव यास अर्पण केली. तत्पूर्वीही कोकणाकडील त्यांच्या मिळकतीतून त्यांनी त्या देवळाच्या जीर्णोद्धाराला साहाय्य केले होते.
     इंग्रजी शिक्षण आणि खिस्ती मिशनर्‍यांचा आक्रमक प्रचार याला भुलून त्या काळी अनेक जण हिंदु धर्मावर दुगाण्या झाडीत; मात्र लोकमान्य टिळक हिंदु धर्माचे महत्त्व जाणून होते. टिळकांनी धर्मासंबंधी आपली मते अनेकदा व्यक्त केली आहेत. स्वामी विवेकानंदांसंबंधीच्या ८ जुलै १९०२ च्या ‘केसरी’तील मृत्यूलेखात टिळकांनी म्हटले होते, ‘‘आमच्याजवळ जर काही महत्त्वाचा ठेवा असेल, तर तो आमचा धर्मच होय. आमचे वैभव, आमचे स्वातंत्र्य, सर्व काही लुप्त झाले आहे; परंतु आमचा धर्म अद्याप आमच्यापाशी शिल्लक आहे आणि तो असा-तसा नव्हे, तर सुधारलेल्या राष्ट्रांत उघड रितीने कसोटीस लावला असताही त्याचा कस शुद्ध आणि उत्कृष्ट  येतो, हे आता अनुभवास आलेले आहे. अशा स्थितीत जर आम्ही त्यास सोडून देऊ, तर इसापनीतीतील कोंबड्याप्रमाणे आम्ही रत्नपारखी आहो, अशी आमची सर्व जगभर नालस्ती होईल !’’ अशाच तर्‍हेचे विचार त्यांनी वेळोवेळी प्रकट करून आपला धर्माभिमान व्यक्त केला आहे. शिक्षणातही त्यांनी धर्मशिक्षणाचा पुरस्कार केलेला आढळतो.
    खिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेल्या धर्मांतरानिमित्त हिंदूंना उद्देशून ‘जागे व्हा किंवा मरा !’ या लेखात (केसरी, २१ मे १९०१) त्यांनी ‘धर्मस्वातंत्र्य कायम ठेवून आपणाला आता धर्मरक्षणाच्या तजविजी करावयास हव्यात’, असे म्हटले होते.
    लो. टिळक मंडालेला बंदिवासात असतांना त्यांचे दोघे चिरंजीव मॅट्रीकला होते. अभ्यास कसा करावा, याच्या सूचना पत्रातून देतांना ‘मनाच्या एकाग्रतेसाठी प्रतिदिन १५ ते २० मिनिटे जप करावा’ अशीही सूचना त्यांनी मुलांना केली आहे.
    - श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi