स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला...
स्वातंत्र्याच्या ६४ वर्षांनंतरही भ्रष्ट आणि सत्तालोलूप राज्यकर्त्यांमुळे देश आज अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. भ्रष्टाचार आणि जिहादी आतंकवाद यांमुळे जनता विशेषतः हिंदू भरडले जात आहेत. देशातील या भीषण स्थितीविषयी जागृत करणारी आणि आत्मचिंतन करण्यास लावणारी लेखमाला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त आजपासून प्रसिद्ध करत आहोत. आज आपण आर्य समाजाचे विचारवंत सत्यव्रत सामवेदी यांनी केलेले विचारमंथन पाहूया.‘भारतात आज स्फोटक स्थिती आहे. पाश्चिमात्य संसदीय शासनप्रणालीचे अनुकरण केल्यामुळे आपण विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. संपूर्ण राष्ट्र विकृत राजनीतीच्या असाध्य व्याधीने ग्रासलेले आहे. देशावर भ्रष्ट, अपराधी राजकारणी अन् भांडवलदार यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या अपवित्र युतीने देशाच्या नागरिकांचे प्रथम मांस खाल्ले, नंतर त्यांचे रक्त प्यायले आणि आता त्यांची हाडे खाण्याचीही सिद्धता आहे. (या अपवित्र युतीने या देशातील जनतेला अत्याचारांच्या चक्रात गोवले आहे.) म्हणून संपूर्ण देशात अराजकतेची स्थिती आहे. त्यात उपासमार झालेले आणि अंगावर वस्त्र नसलेले निरोद्योगी (बेरोजगार) नवयुवक आता हिंसेचा मार्ग अवलंबत आहेत.
२. भारताच्या एक चतुर्थांश भागात, म्हणजे २०० जिल्ह्यांवर नक्षलवाद्यांचे वर्चस्व असणे
भारताच्या एक चतुर्थांश भागात, म्हणजे २०० जिल्ह्यांवर नक्षलवाद्यांनी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय सैन्यही नक्षलवाद्यांसमोर हतबल आहे. प्रतिदिन नक्षलवादी युवकांकडून सैन्य आणि पोलीस दलातील युवकांची हत्या केली जात आहे. तेथे शासकीय यंत्रणा कार्यरत नाही. तेथे पोलीस चौक्या आणि न्यायालये नाहीत.
३. भ्रष्ट राजकारणी आणि भांडवलदार यांनी देशाच्या गरीब जनतेकडून त्यांच्या जागा अन् जंगले हिसकावून घेतली असून त्यांचे चरितार्थाचे साधन हिरावून घेतल्यामुळे या युवकांसमोर हिंसा करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय शिल्लक नसणे
भ्रष्ट राजकारणी आणि भांडवलदार यांनी देशाच्या गरीब जनतेकडून त्यांच्या जागा अन् जंगले हिसकावून घेतली आहेत आणि त्यांचे चरितार्थाचे साधन हिरावून घेतले आहे. आता या युवकांसमोर हिंसा करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय शिल्लक नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसेतून आपण काहीच बोध घेतला नाही. एक दिवस संपूर्ण भारत या नक्षलवाद्यांच्या विळख्यात सापडेल, याची भ्रष्ट राजकारणी आणि भांडवलदार यांना मुळीच चिंता नाही. देश खड्ड्यात का जाईना, संपूर्ण देश नक्षलवाद्यांच्या अधिकारात जात नाही, तोपर्यंत आपण मात्र गरीब जनतेला लुटून आपले ईप्सित साध्य करत राहूया, असा आणि केवळ हाच विचार भ्रष्ट राजकारणी आणि भांडवलदार करत आहेत.
४. ८३ टक्के जनतेची पिळवणूक करून देशाचा विकासदर ९.५ टक्के असल्याचा ढोल बडवणे, म्हणजे विनाशाच्या दरीत बसून मृत्यूगीत गाणे होय !
देशातील ८३ टक्के जनतेचे प्रतिदिन उत्पन्न २० रुपयांहून अल्प आहे. याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की, देशातील उर्वरित १७ टक्के जनता ८३ टक्के जनतेची पिळवणूक करत आहे आणि तरीसुद्धा आम्ही निलाजरेपणे देशाचा विकासदर ९.५ टक्के असल्याचा ढोल बडवत आहोत. १७ टक्के लोकांच्या विकासाला आम्ही देशाचा विकास समजत आहोत, म्हणजेच आम्ही विनाशाच्या दरीत बसून मृत्यूगीत गात आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६४ वर्षांनंतरही प्रत्येक भारतीय शोकगीत गात आहे.
५. आर्य समाज प्रत्येक कार्यक्रमात स्वातंत्र्योत्तर काळातील पोवाडे गात असणे, आम्हाला आमच्या गौरवशाली भूतकाळाचे गुणगान करण्यातच धन्यता वाटणे; मात्र पूर्वजांनी देशासाठी केलेले बलीदान आणि राष्ट्राच्या आजच्या समस्या सोडवण्यासंबंधी उदासीन असणे
आज स्वातंत्र्यदेवता आगीच्या विळख्यात सापडली आहे आणि ती आग विझवण्याचे दायित्व आर्य समाजावर आहे. आम्ही पहात आहोत की, आर्य समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्ररक्षणावर एक सत्र अवश्य असतेच. त्या सत्रात आम्ही देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील आर्य समाजाच्या भूमिकेचे पोवाडे गातो. पं. रामप्रसाद बिस्मिल, शहीद भगतसिंह, शेरे पंजाब लाला लजपतराय, अमर हुतात्मा स्वामी श्रद्धानंद इत्यादींची स्तुतीसुमने गातो. आम्हाला आमच्या गौरवशाली भूतकाळाचे गुणगान करण्यातच धन्यता वाटते आणि आम्ही कृतकृत्य होतो अन् असे समजतो, ‘आम्ही देशाचे रक्षण केले आहे.’ आम्ही एका कानाने ऐकतो आणि दुसर्या कानाने सोडून देतो. या राष्ट्ररक्षण संमेलनात एकही वक्ता हे सांगत नाही की, आमच्या पूर्वजांनी देशासाठी बलीदान केले आहे; पण आम्ही काय करत आहोत ? एकही वक्ता हे सांगत नाही की, राष्ट्रात एवढ्या समस्या का आहेत ? त्या सोडवण्यासाठी आम्ही काय करू शकतो ?
६. आर्य समाजाने ‘भारत बचाओ’ आंदोलन चालू केले पाहिजे, तसेच सूत्रेही स्पष्ट असायला हवी. भारताला वाचवण्यासाठी पुढील सूत्रांचा समावेश करून प्रसिद्धीपत्रक सिद्ध केले पाहिजे.
६ अ. ‘मेकॉले शिक्षणपद्धती’ अमर वेलीप्रमाणे वाढत असून मुलांमध्ये नैतिक मूल्यांचा र्हास होत असणे आणि आज युवकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी अन् चारित्र्यवान बनण्यासाठीचे शिक्षण देणे आवश्यक असणे : आज आमच्या देशात ‘मेकॉले’ शिक्षणपद्धती अमर वेलीप्रमाणे वाढत आहे. गल्लीगल्लीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पूर आला आहे. ८३ टक्के विद्यार्थी अशा संस्थांमध्ये शिक्षण घेत आहे. जेथे त्यांना काहीही भवितव्य नाही. ‘बी.ए.’, ‘एम्.ए.’, ‘पी.एच्.डी.’, ‘एम्.एस्.सी.’, अशा पदव्या घेऊनही ते बेरोजगारच आहेत. १७ टक्के जनतेची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत आहेत आणि अशा संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांना भरघोस वेतन देणारी पदे दिली जात आहेत. ४० लाख रुपये लाच देऊन विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत. आमच्या या शिक्षणसंस्थांमध्ये नैतिक मूल्यांना काहीच स्थान उरले नाही. केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण देणे एवढेच काम शिक्षकांना राहिले आहे. अशा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी काहीच संबंध नसतो. हेच बेरोजगार नवयुवक आज संपूर्ण देशात हिंसा पसरवत आहेत. आम्हाला बारावीतील विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले पाहिजे की, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि चारित्र्यवान होतील.
६ आ. भ्रष्टाचार
६ आ १. आज देशात भ्रष्टाचारी राजकारणी आणि शासकीय कर्मचारीवर्ग जनतेला लुटत असणे आणि संपूर्ण देशात घोटाळेच घोटाळे होत असणे : राजकारणी आणि शासकीय कर्मचारीवर्ग जनतेला लुटत आहेत. कोणतेही काम लाच दिल्याविना होत नाही. संपूर्ण देशात घोटाळेच घोटाळे होत आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्र्यावर ६० सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे; परंतु आघाडीच्या राजकारणामुळे त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई होऊ शकत नाही. ‘कॉर्पोरेट’ जगाकडून ६० कोटी रुपयांचा आयकर येणे बाकी आहे. तो वसूल केला जात नाही आणि गरीब लोकांची संपत्ती जप्त केली जात आहे.
६ आ २. भ्रष्टाचार्यांच्या विरोधात स्वतंत्रपणे कारवाई करण्यासाठी एक बिगरशासकीय यंत्रणा असणे आवश्यक ! : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी उमेदवार वर्गणीच्या रूपात कोट्यवधी रुपये गोळा करतात. अशा सर्व उमेदवारांची चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी सिद्ध झाल्यास त्यांची उमेदवारी अपात्र ठरवून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली पाहिजे. चीनमध्ये जर भ्रष्टाचारी लोकांना फाशीची शिक्षा दिली जाते, तर भारतात त्यांच्यावर पायबंध घालण्याची काही व्यवस्था का नाही ? भ्रष्टाचार्यांच्या विरोधात स्वतंत्रपणे कारवाई करण्यासाठी एक अशासकीय यंत्रणा असायला हवी.
६ इ. देशाची संपत्ती गिळंकृत करणार्या खासदार-आमदार यांच्या वेतनवाढीच्या विरोधात आर्य समाजाने पुढाकार घेतल्यास देशाची
८३ टक्के जनता आर्य समाजाचा जयघोष करील ! : ज्या खासदार-आमदार सदस्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोट्यवधी, अब्जावधी रुपये कमावले आहेत, ते आज त्यांचे वेतन पाचपटीने वाढवण्यासाठी संसदेत धुमाकूळ घालत आहेत. या सदस्यांना काहीच मर्यादा राहिल्या नाहीत. ते सर्वसंमतीने ठराव संमत करून संपूर्ण देशाची संपत्ती गिळंकृत करू पहात आहेत. जर आर्य समाजाने संसदेसमोर शक्तीप्रदर्शन करून घोषणा दिल्या की, आम्ही खासदार आणि आमदार यांच्या वेतनामध्ये एका रुपयानेही वाढ होऊ देणार नाही, तर देशाची ८३ टक्के जनता आर्य समाजाचा जयघोष करील.
६ ई. भारतात शेतकर्यांच्या आत्महत्या विश्वाच्या इतिहासातील सर्वात अधिक करुणाजनक घटना असणे : आज भारतातील शेतकरी सर्वात अधिक दुःखी आहे. स्वतंत्र भारतातील लाखो शेतकर्यांच्या आत्महत्या या विश्वाच्या इतिहासातील सर्वाधिक करुणाजनक घटना आहेत. आज भांडवलदार शेतकर्यांना कृषीखाद्य, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे, वीज, पाणी यांच्या नावावर कशा प्रकारे लुटत आहे, हे सर्वविदित आहे. या शेतकर्यांना संघटित केल्याविना क्रांती होऊ शकणार नाही. त्यांना संघटित करणे, हेच पं. रामप्रसाद बिस्मील आणि भगतसिंह यांचे ध्येय होते.
६ उ. शासन निर्भीड आणि पराक्रमी असले पाहिजे ! : महर्षी दयानंद यांनी आदर्श शासन कसे असावे, याविषयी मार्गदर्शन करतांना म्हटले होते, ‘इंद्रो जयाति न परा जयाता...’ - अथर्ववेद, काण्ड ६, सूक्त ९८, खण्ड १
अर्थ : हे मनुष्य, या समाजाचा कर्ता जो शत्रूला जिंकू शकेल आणि जो शत्रूकडून कधीही पराभूत होत नाही, तोच प्रजेचा शासनकर्ता आहे.
दण्डः सुप्तेषु जागर्ति दण् धर्मं विदुर्बुधाः । - महाभारत, शान्तिपर्व, अध्याय १५, श्लोक २
अर्थ : लोक झोपलेले असले, तरी ‘दंड’ म्हणजे शासनव्यवस्था जागी असते; म्हणून शासनव्यवस्था हाच खरा धर्म आहे, असे जाणते म्हणतात.६ ऊ. आमच्या उणिवा
६ ऊ १. आर्य समाजाच्या २-४ नेत्यांनी जनजागृती मोहिमेचा संकल्प केला, तरी देशामध्ये एका वर्षात क्रांती होईल, ती सर्व विसंगती आणि दुर्गुण यांची राखरांगोळी करील ! : आर्य समाजाने अनेक चिंतन शिबिरे आयोजित केली होती; परंतु त्यांचे दृश्य परिणाम काहीच दिसले नाहीत. या चिंतन शिबिरांतून काही फलनिष्पत्ती होईल, असा लोकांचा आता विश्वास राहिला नाही. आर्य समाज आजही एक महान शक्ती आहे; परंतु त्याला जागृत करणारे कोणी नाही. आर्य समाजातील २-४ नेत्यांनी जरी जनजागृती मोहिमेचा संकल्प केला, तरी वणवा पेटून उठेल. आम्ही मागील चाळीस वर्षांपासून आर्य समाजाच्या कार्यक्रमांतून जाऊन पाहिले आहे, त्याने देशाचे काही भले होणार नाही. या उत्सवांचा मोह सोडून एक वर्षभर देशाची भटकंती केली, तर देशामध्ये एका वर्षात अशी क्रांती घडून येईल, जी सर्व विसंगती आणि दुर्गुण यांची राखरांगोळी करील.
६ ऊ २. संसदेसमोर उभी राहून ‘हे सत्ताधार्यांनो, भीषण काळाचा घंटानाद ऐकून सिंहासन रिकामे करून ते जनतेच्या हाती सोपवून मार्ग मोकळा करा !’, असे सांगणारी लोकशक्ती उभी करणे आवश्यक ! : अशा अनेक समस्यांवर आम्हाला गंभीरपणे विचार करायला हवा. अशी लोकशक्ती उभी करायला हवी की, जी एक दिवस संसदेसमोर उभी राहून स्वामी इंद्रवेश यांचे गीत सुरात सूर मिसळून आव्हान देईल, ‘हे सत्ताधार्यांनो, भीषण काळाच्या घंटेचा नाद ऐका आणि तुमचे सिंहासन रिकामे करून ते जनतेच्या हाती सोपवून मार्ग मोकळा करा.’
(आर्यनीती, १०.७.२०१०)


