आपल्या स्वयंसेवकांना सदैव दक्ष रहाण्याचा आदेश देणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आता अमेरिका सदैव लक्ष ठेवणार आहे. अमेरिकेने यासाठी अमेरिकेच्या संसदेत विधेयकच मांडले आहे. संघावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका विशेष दूत नेमणार असून दूतांच्या कामकाजासाठी प्रतिवर्षी ४ कोटी रुपये खर्च करणार आहे. वाचकांना प्रश्न पडला असेल, आतापर्यंत काँग्रेस शासन संघावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि काँग्रेसने संघावर स्वातंत्र्यानंतर तीन वेळा बंदीही घातली आहे; मात्र आता अमेरिकेला संघावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता का भासली ? तर याचे उत्तर मोठे विनोदी आहे.
मुसलमानांविरुद्धच्या आतंकवादी कारवायांत रा.स्व. संघाशी संबंधित अनेक व्यक्तींनी सहभाग घेतल्याचा अमेरिकेचा दाट संशय आहे. या संशयावरूनच संघावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेने तिचा मोर्चा संघाकडे वगळला आहे. अमेरिकेच्या या कृतीवर नेहमीच गप्प रहाणारा संघ उत्तर देईल, अशी अपेक्षा आहे; मात्र भारतातील एका राष्ट्रवादी संघटनेवर अमेरिकेकडून असा आरोप होतो आणि एका सार्वभौम राष्ट्रातील संघटनेवर अमेरिका लक्ष ठेवण्यासाठी कायदा करते अन् त्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करते, हे भारताच्या स्वातंत्र्याला आव्हान आहे. याचा प्रथम भारतीय राज्यकर्त्यांनी निषेध करून जाब विचारायला हवा; मात्र मुसलमानधार्जिण्या काँग्रेसकडून तसे होण्याऐवजी उलट अमेरिकेला संघावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक सर्व शासकीय मदत देण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या दांडगाईचा विरोध करा !
हिंदुस्थानसह पूर्व आणि दक्षिण मध्य आशियाई देशांमधील अल्पसंख्यांकांची सुरक्षा आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी अमेरिका संबंधित देशांच्या अंतर्गत व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणार आहे. सर्व जगावर आपले राज्य आहे आणि आपण जे ठरवणार त्याप्रमाणे जगाने वागले पाहिजे, अशी दादागिरी अमेरिका नेहमीच करत आली आहे; मात्र आता अमेरिकेचे दिवस पालटू लागले आहेत. चीन नवीन महासत्ता म्हणून पुढे येत आहे. अशा वेळी अमेरिकेला इराणने दिलेला दम, इराकमधून गाशा गुंडाळण्याचा केलेला प्रारंभ, अफगाणिस्तान सोडण्याचा घेतलेला निर्णय आणि पाकने अमेरिकेला डोळे वटारून दाखवण्याचे धाडस पहाता अमेरिकेला तिची दादागिरी दाखवण्यासाठी दक्षिण आशिया दिसू लागला आहे; मात्र ते करतांना मुसलमानांच्या तथाकथित सुरक्षेचे कारण सांगणे म्हणजे चोरांची रखवालदारी करण्यासारखेच आहे. जगात इस्लामी आतंकवाद निर्माण होण्यामागे अमेरिकाही कारणीभूत आहे. अफगाणिस्तानमध्ये रशियाने घुसखोरी केल्यावर त्याला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने निर्माण केलेला लादेन नावाचे भूत सर्व इस्लामी आतंकवाद्यांचा प्रणेता ठरला. येथून चालू झालेला इस्लामी आतंकवाद जगभर फोफावला आणि त्याचा फटका अमेरिकेलाही बसला आणि बसत आहे. भारतालाही तो बसत आहे. भारतात त्या विरोधात लढण्याची आवश्यकता असतांना संघ शेपूट घालून बसला आहे. भाजपच्या सत्ताकाळात तो निपटून काढता येऊ शकत असतांना उलट पाकबरोबर शांतीवार्ता करण्याचा मूर्खपणा करण्यात आला. त्याच संघावर मुसलमानांच्या विरोधात लढत असल्याचे कारण सांगत लक्ष ठेवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणजे हिंदूंची गळचेपी करणेच होय. संघाशी संबंधितांनी असा प्रयत्न केला असता आणि अमेरिकेने लक्ष ठेवण्याचे म्हटले असते, तर एकवेळ समजू शकलो असतो; मात्र तसेही नाही. अमेरिकेने असा कायदा करण्यामागे आणखी एक कारण सांगितले जात आहे, ते म्हणजे नॉर्वे येथील आक्रमण. या आक्रमणाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आतंकवादी आंद्रे बेहरिंग ब्रिविक याने त्याच्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, जगभरातून लोकराज्य शासनप्रणाली नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रवादीच चांगले सहकार्य करू शकतात. त्यासाठी भाजप, रा.स्व. संघ, अभाविप यांची संकेतस्थळे पहाण्याचे आवाहन त्याने केले आहे. या कबुलीजबाबामुळेच अमेरिका संघावर लक्ष ठेवण्याचा उपद्व्याप करत आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. तरीही हिंदूंनी आणि त्याच्या सर्व संघटनांनी संघटित होऊन अमेरिकेच्या या दांडगाईचा विरोध केला पाहिजे.
