![]() |
| कु. दीपा तिवाडी |
१. ‘आज लवकर झोपूया’, असे ठरवणे आणि रात्री पहार्याच्या सेवेत नाव वाचल्यावर ही सेवा कशी जमणार, असे वाटणे, नंतर ‘ती सेवा जमणार आहे; म्हणूनच ईश्वराने निवड केली आहे आणि तोच करवून घेणार आहे’, असे विचार मनात येणे : ‘७.६.२०११ या दिवशी दुपारपासूनच माझ्या मनात येत होते, ‘आज लवकर झोपूया. दोन दिवस आपण लवकर उठत आहोत.’ शारीरिक क्षमताही घटल्यासारखे वाटत होते. रात्री जेवण झाल्यावर १०.३० वाजता फलकावर पहार्याच्या नियोजनात माझे नाव वाचले. तेव्हा ‘मला झोप येत असून मी पहारा कशी करणार’, असे वाटून अस्वस्थता जाणवू लागली.
‘आज जमणार नाही, असे सांगूया’, असेही वाटले. त्याच वेळी ‘ती सेवा जमणार आहे; म्हणूनच ईश्वराने माझी निवड केली आहे आणि तोच करवून घेणार आहे’, असे विचार आले. सतत ईश्वराचा धावा होऊ लागला, ‘देवा मला परिपूर्ण सेवा करायची आहे, तशी सेवा करण्याची माझी कुवतही नाही. तूच ती करवून घे. मला पहार्याच्या सेवेत झोपायचे नाही.’
२. सेवा चालू झाल्यावर १५ मिनिटांतच झोप येऊ लागणे, तेव्हा देवाला विचारल्यावर त्याने वेगवेगळे उपाय सुचवणे, त्यामुळे झोप न येता पहाटे ४ पर्यंत सेवा करू शकणे : प्रत्यक्षात सेवेला जाण्याच्या वेळी डोके जड वाटू लागले. सेवा चालू झाल्यावर १५ मिनिटांतच झोप येऊ लागली. मी देवाला विचारले, ‘आता मी काय करू ? मला तर सेवा पूर्ण करायची आहे.’ तेव्हा मला रडू येऊ लागले. त्या वेळी देवाने सुचवले, ‘टप्याटप्याने प्रयत्न करून पहा.’ त्याप्रमाणे प्रयत्न चालू झाले. प्रथम प्रार्थना केली. प्रत्येक प्रार्थना इतकी भावपूर्ण होत होती की, ती ईश्वरापर्यंत पोहोचत आहे, असे जाणवत होते. त्यानंतर डोळ्यांवर पाणी शिंपडणे, भजने ऐकणे, बसून रहाण्याऐवजी फिरत रहाणे, अत्तराचा सुगंध घेणे इत्यादी उपाय झाले. त्यामुळे काही काळ झोप न येता चांगले वाटले. नंतर पुन्हा झोप येऊ लागली. तेव्हा ‘आता शिक्षा पद्धतीचा वापर करायला हवा’, असे वाटले. त्याप्रमाणे मी स्वतःला जोरात चिमटा घेतला, गालावर मारले. असे ३ - ४ वेळा केले. सातत्याने ईश्वराला प्रार्थना करत होते. तेव्हा जोरात चिमटा घेऊनही त्याचा त्रास मला झाला नाही. त्या वेळी लक्षात आले, ‘श्रीकृष्णाने कृती करून घेतली; पण त्यातून होणार्या वेदनांचे प्रमाण न्यून केले.’ श्रीकृष्ण माझी सेवा परिपूर्ण व्हावी या दृष्टीने घेत असलेली काळजी पाहून फार कृतज्ञता वाटली आणि या सेवेतून आजपर्यंत मिळाला नाही, इतका आनंद मिळाला. असे सर्व प्रयत्न श्रीकृष्ण करवून घेत असतांना पहाटेचे ३.३० कधी वाजले, याची जाणीवही झाली नाही. सहसाधिकेला काही कारणास्तव येण्यास ४ वाजले. तोपर्यंत ती सेवा मी करू शकले.
३. शेवटी कृतज्ञता व्यक्त करतांना पुष्कळ भाव दाटून येणे आणि सर्व आकाश भरून श्रीकृष्णतत्त्व असून तो स्वतःजवळ आहे, असे जाणवणे : शेवटी कृतज्ञता व्यक्त करतांना पुष्कळ भाव दाटून आला. त्या वेळी मी अधिक लहान लहान होत गेल्याचे जाणवले. मी ठेंगणी असून सर्व आकाश भरून श्रीकृष्णतत्त्व आहे आणि तो माझ्या जवळ आहे, असे जाणवले. माझ्यासमोर साक्षात श्रीकृष्ण निर्गुण रूपात आहे, असे तीव्रतेने जाणवले. ती सेवा सोडून जाऊ नये, असे वाटले.
हे श्रीकृष्णा, हे सर्व तूच करवून घेतलेस. तुझ्या कृपेमुळेच ‘प्रयत्नांती परमेश्वर असतो’, याची प्रचीती आली आणि आनंदात न्हाऊन निघता आले. त्यासाठी तुझ्या चरणी अनंत कोटी वेळा कृतज्ञता. तुला अपेक्षित असे प्रयत्न आम्हा सर्व साधकांकडून सतत होऊ देत. प्रत्येक सेवा झोकून देऊन करण्याची धडपड वाढू दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
- कु. दीपा तिवाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
