'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

श्री. शशीकांत पवार यांना गंभीर आजारपणात आलेल्या अनुभूती

श्री. शशीकांत पवार
‘मी नोव्हेंबर २०१० पासून कर्करोगाने आजारी आहे. यासाठी माझ्या अनेक चाचण्या आणि दोन शस्त्रकर्मे झाली. दुसर्‍या शस्त्रकर्मानंतर वैशाख शुद्ध दशमी/एकादशी, कलियुग वर्ष  ५११३ (१३.५.२०११) या दिवशी मी आधुनिक वैद्य कुलकर्णीकाकांसमवेत पनवेल येथील आधुनिक वैद्य नितीन जोशी यांच्याकडे पुढील पडताळणीसाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि माझ्या दुसर्‍या शस्त्रकर्माच्या वेळी रुग्णालयात असतांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

१. तीव्र प्रारब्ध असल्याने ते भोगूनच संपवायचे आहे, असा निरोप प.पू. डॉक्टरांकडून आल्याने शस्त्रकर्म करण्यासाठी मनाची सिद्धता होणे

    कर्करोगाचे निदान झाल्यावर माझे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. पनवेल येथील आधुनिक वैद्य नितीन जोशी हे माझ्यावर शस्त्रकर्म करणार होते. त्या वेळी त्यांनी मला शस्त्रकर्म केल्यामुळे उद्भवणारे धोके सांगून पूर्वकल्पना दिली होती. याची घरच्यांना कल्पना देणे आणि त्यांची अनुमती घेणे आवश्यक होते. शस्त्रकर्म करण्यातील अडचणी कळल्यामुळे माझे मन अस्थिर झाले होते. भगवंताला प्रार्थना करून मी आणि आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णीकाका आमच्या घरी गेलो. घरच्यांना शस्त्रकर्माविषयी सर्व माहिती दिली. या वेळी आई-वडिलांची शस्त्रकर्म करण्याची मनाची सिद्धता नव्हती. अशा कठीण प्रसंगी ‘प.पू. डॉक्टरांना आई-बाबांचे मत सांगूया’, असे वाटले आणि आम्ही त्याप्रमाणे केले. आम्हाला गोव्याहून निरोप आला, ‘आधुनिक वैद्य सांगतात, त्याप्रमाणे शस्त्रकर्म करावे. हे तीव्र प्रारब्ध असल्याने ते भोगूनच संपवायचे आहे.’ असा निरोप मिळाल्यावर मी निश्चिंत झालो. प्रारब्ध भोगण्यासाठी शक्तीही भगंताकडूनच मिळणार होती.
२. रुग्णालयात गेल्यावर आलेल्या अनुभूती
२ अ. शस्त्रकर्मासाठी जातांना भगवंत समवेत असणे : माझे कर्करोगाचे निदान झाल्यावर शस्त्रकर्म करण्याचे ठरले. त्यासाठी चैत्र शुद्ध चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११३ (१७.४.२०११) या दिवशी सकाळी मी ‘एम्.जी.एम्’ रुग्णालयात प्रविष्ट होण्यासाठी गेलो असता, तेथील एक आधुनिक वैद्य माझी वाट पहात उभे होते. खरेतर त्यांनी माझी वाट पहात थांबणे आवश्यक नव्हते; पण ‘भगवंत आपली सर्व काळजी घेत आहे आणि त्याच्या कृपेनेच सर्व घडत आहे’, असे जाणवले. 
२ आ. रुग्णालयात प्रविष्ट होण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करतांना अडचणी येणे आणि प्रार्थना केल्यावर त्यातून मार्ग मिळणे : मी रुग्णालयात शस्त्रकर्मासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करत असतांना तेथील अधिकार्‍याने मला शिधापत्रिका आणण्यास सांगितले. (प्रत्यक्षात हे त्यांनी मला अगोदर सांगितले नव्हते.) वेळ अल्प असल्याने ती आणण्यासाठी मला पुन्हा घरी जावे लागले. घरीसुद्धा मला शिधापत्रिका सापडत नसल्याने मी भगवंताला प्रार्थना केली. त्यानंतर लगेच मला त्याची एक छायांकित प्रत मिळाली. मी घरातून बाहेर पडल्यावर लगेचच वाहन मिळून वेळेत रुग्णालयात पोचू शकलो. हे सर्व भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच घडत होते.
२ इ. रुग्णालयातील आधुनिक वैद्याने शस्त्रकर्मासाठीचे पूर्ण साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगून घरी जाण्यास सांगणे आणि त्याही स्थितीत मला स्थिर रहाता येणे : शस्त्रकर्माच्या आदल्या दिवशी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार मी लागणारे सर्व साहित्य घेऊन आलो होतो. तरीही शस्त्रकर्माच्या दिवशी सकाळी मी कक्षात गेल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी पूर्ण साहित्य आणले नसल्याचे सांगून मला परत घरी जाण्यास सांगितले. मी याविषयी माझे शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य नितीन जोशी यांना हे सांगितले. तेव्हा त्यांनी उर्वरित सर्व साहित्याची व्यवस्था केली. या स्थितीतही मी देवाच्या कृपेने स्थिर राहू शकलो.
२ ई. शस्त्रकर्मासाठी रक्ताच्या चार बाटल्यांची आवश्यकता असणे आणि भगवंताच्या कृपेने रुग्णालयातच त्याची सोय होणे : माझ्या शस्त्रकर्मासाठी ४ बाटल्या रक्ताची आवश्यकता होती. त्यानुसार आम्ही प्रयत्न करत होतो. आश्रमातील तीन साधकांचे रक्तगट माझ्या रक्तगटाशी जुळणारे होते, तरी एक बाटली रक्त बाहेरून आणणे आवश्यक होते; पण भगवंताने इथेहीr माझी सोय केली. त्याच वेळी रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे मला आवश्यक असणारे रक्त त्या कार्यशाळेतून मिळाले. किती ही भगवंताची कृपा !
२ उ. अतीदक्षता विभागामध्ये असतांना आध्यात्मिक त्रास जाणवणे :  मी शस्त्रकर्मानंतर तीन दिवस अतीदक्षता विभागात होतो आणि १४ दिवस शस्त्रकर्म विभागात (‘सर्जिकल वार्ड’मध्ये) होतो. तीन दिवस अतीदक्षता विभागामध्ये असतांना मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास जाणवला. मला नाकातून नळी टाकल्यामुळे काहीच बोलता येत नव्हते आणि पाणीही घेता येत नव्हते. मी तीन दिवस गुंगीतच होतो. नामजप आणि प्रार्थना होत नव्हती. नंतर मला शस्त्रकर्म विभागात  ठेवल्यावर थोडे बरे वाटले.
२ ऊ. आठ दिवस अन्न अन् पाणी न घेतल्याने सरदार भगत सिंग यांची आठवण येणे आणि त्यांनी २३ दिवस अन्न अन् पाणी न घेतल्याचे आठवून मनाची सिद्धता होणे : माझ्या पोटाचे मोठे शस्त्रकर्म झाल्याने मला आठ दिवस अन्न-पाणी घ्यायचे नव्हते. दोन दिवस पाणी न मिळाल्यामुळे माझा घसा पूर्ण कोरडा झाला होता. तसेच नाकातून पोटात नळी टाकल्यामुळे मला घशात त्रास जाणवत होता. तेव्हा भगवंताने माझ्या मनात ‘सरदार भगत सिंग’ यांचा विचार टाकला. त्यांनी सलग २३ दिवस अन्न-पाणी न घेतल्याचे आठवून माझ्या मनाची सिद्धता झाली. ‘सरदार भगत सिंग यांनी स्वातंत्र्यासाठी  २३ दिवस अन्न-पाणी ग्रहण केले नव्हते, तर आपण स्वतःचे प्रारब्धभोग संपवण्यासाठी काही दिवस अन्न-पाण्याविना राहू शकत नाही का’, असा विचार माझ्या मनात आला आणि मी आठ दिवस अन्न-पाण्याविना काढले.
२ ए. रुग्णालयात असतांना धर्मवीर संभाजी महाराजांची आठवण येणे आणि होणार्‍या त्रासाला सामोरे जाता येणे : शस्त्रकर्म करतांना  पोटाच्या मध्यभागी ‘स्टेपलरच्या पिनां’द्वारे ३२ टाके घातले होते. जखम मोठी होती. जखमेला मलमपट्टी करतांना पुष्कळ वेदना होत असत. आधुनिक वैद्य मलमपट्टी करायला आले की, मी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करत होतो. त्यामुळे मला वेदना जाणवत नसत. १४ दिवसानंतर माझे टाके काढायचे होते. आधुनिक वैद्य टाके काढण्यासाठी आले. ते एक एक करून माझ्या पोटावरील ‘स्टेपलरच्या पिना’ उपसू लागले. जेव्हा पहिली ‘पीन’ काढण्यात आली, तेव्हा मला पुष्कळ वेदना झाल्या आणि मी जोरात ओरडलो. मी आधुनिक वैद्यांना हळुवारपणे टाके काढण्याची विनंती केली; पण त्यांनी दुर्लक्ष केले. ते पीन काढत असतांना माझे टाके पुन्हा उघडले गेले आणि जखमेतून रक्त येऊ लागले. मला अचानक धर्मवीर संभाजी महाराजांची आठवण आली. धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी सर्व सहन केले. ‘त्यांची तर चामडी ओढून काढली होती. त्याच्यापुढे या वेदना तर काहीच नाहीत’, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे प्रत्येक ‘पीन’ काढतांना मी संभाजी महाराजांची आठवण काढून एकदाही ओरडलो नाही आणि आधुनिक वैद्यांना विनंतीही केली नाही. सर्व सहन केले.
२ ऐ. ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप केल्याने पुष्कळ वेदनादायक ‘इंजेक्शन’ असूनही वेदना न जाणवणे आणि त्या वेळी ‘रामसे बडा रामका नाम’ याची आठवण येणे : मला शस्त्रकर्मापूर्वी ‘सलाईन’ लावण्यात येणार होते. तेथील आधुनिक वैद्यांना माझ्या हातातील शीर सापडत नव्हती; म्हणून ते हातावर वेगवेगळ्या ठिकाणी सुई टोचत होते. मला आरंभी थोडा त्रास झाला; पण मी लगेच ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करू लागलो. नामजप करू लागल्यावर मला होणारा त्रास न्यून झाला. अशी अनुभूती मला पुष्कळ वेळा आली. त्यामुळे मी निर्धास्त झालो. आता काहीही होऊ दे, आधुनिक वैद्य कितीही वेळा सुई टोचू देत, मला त्याची भीती किंवा वेदना जाणवत नव्हती. मला देण्यात येणारे ‘इंजेक्शन’ पुष्कळ वेदनादायक होते. प्रत्येक वेळी ‘इंजेक्शन’ देण्यापूर्वीच मी नामजप करत होतो. माझी ‘प.पू. डॉक्टर’ या नामावर श्रद्धा दृढ झाली. ‘राम से बडा राम का नाम’ या पंक्तीची मला अनुभूती आली. मला पुष्कळ आनंद मिळत होता.
३. आधुनिक वैद्य नितीन जोशी यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे
३ अ. आधुनिक वैद्य नितीन जोशी यांनी शस्त्रकर्म करण्यातील धोका सांगून केवळ गुरुकृपेनेच हे शस्त्रकर्म यशस्वी झाल्याचे सांगणे, तसेच कर्तेपणा गुरूंच्या चरणी अर्पण करणे : आधुनिक वैद्य नितीन जोशी यांनी माझी आस्थेने चौकशी केली. त्यांनी माझ्यावर केलेल्या शस्त्रकर्माविषयी माहिती दिली. ते म्हणाले ‘‘तुझ्या शस्त्रकर्माच्या पूर्वी तीन दिवस प्रतिदिन १२ घंटे मी या शस्त्रकर्माचा अभ्यास करत होतो. त्यातील धोके आणि अडचणी यांविषयी मी स्वतः वाचन करून आणि अन्य आधुनिक  वैद्यांकडून माहिती घेत होतो. शस्त्रकर्मामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मी सर्व परिश्रम घेतले होते.’’ माझ्या शरिरातील कर्करोगाच्या पडताळणीसाठी जे शस्त्रकर्म करायचे होते, त्यामध्ये हृदयातून येणार्‍या शुद्ध रक्तवाहिनीवर छेद द्यावा लागणार होता. त्यामुळे जिवाला धोका निर्माण झाला असता; परंतु ‘‘शस्त्रकर्मात कोणताही अडथळा आला नाही आणि तुझे प्राण वाचले, ही केवळ तुमचे गुरु (प.पू.डॉक्टर ) आणि माझे सदगुरु (प.पू. क्षीरसागर महाराज) यांची कृपा! तुमच्या गुरूंमुळे तुझे प्राण वाचले आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मला हे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे करता आले’’, असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. हे बोलणे चालू असतांना त्यांनी सहा वेळा प.पू. डॉक्टरांचे नाव घेतले आणि सर्व कर्तेपणा सद्गुरूंच्या चरणी अर्पण केला.
३ आ. आधुनिक वैद्य नितीन जोशी यांनी या शस्त्रकर्माकडे व्यवसाय म्हणून न पहाता रुग्णाच्या मुखावरील समाधान आणि हास्य यांकडे पहाणे : ‘‘या शस्त्रकर्मासाठी ३ लक्ष रुपये व्यय आला असता; पण मी व्यवसायाकडे पाहिले नाही, तर तुझ्या मुखावरील समाधान आणि हास्य पाहून माझे समाधान झाले. याचे मूल्य ३ लक्ष रुपयांहूनही अधिक आहे’’, असे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टींचे कर्तेपण त्यांनी प.पू. डॉक्टर आणि त्यांचे सद्गुरु प.पू. क्षीरसागर महाराज यांना दिले. मीसुद्धा या सर्व उपचारांसाठी भगवान श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टर, आधुनिक वैद्य नितीन जोशी आणि आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णीकाका यांच्या चरणी कृतज्ञ आहे. भगवंताच्या कृपेनेच मला पुनर्जन्म मिळाला आहे.’
- श्री. शशीकांत पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

प.पू. पांडे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘ॐ चिं चित्र घंटाभ्यां नमः’ हा मंत्रजप केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळणे अन् कर्करोगासारख्या मोठ्या आजारपणात कोणत्याही प्रकारचा त्रास न होणे : ‘फेब्रुवारी २०११ मध्ये मला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर प.पू. पांडे महाराजांनी ‘ॐ चिं चित्र घंटाभ्यां नमः ।’ हा मंत्रजप करण्यास सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार दिवसातून तीनदा १०८ वेळा मी जप करत असे. प.पू. महाराजांच्या संकल्पामुळे मंत्रजप करण्याने मला मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळाले. त्यामुळे कर्करोगासारख्या मोठ्या आजारपणात मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.’
- श्री. शशिकांत पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi