मुंबई, ३१ मे (वार्ता.) - मुंबईतील मिठी नदीतील गाळ न काढल्याने, तसेच नदीच्या भोवती अतिक्रमण केल्याने नदीचे पात्र अरूंद झाले, त्याचा परिणाम म्हणून खिस्ताब्द २००५ मध्ये मुंबई पाण्याखाली गेली होती.
यंदा पावसाळा आठ दिवसांवर येऊन ठेपला असला, तरीही मिठी नदीच्या सफाईविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. नदीची सफाई कोणी करावी, यासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर विकास प्राधिकरण यांच्यात वाद निर्माण झाला आहे.(२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे याच मिठी नदीने मुंबईचे जनजीवन ठप्प केले होते. असे असतांनाही शासन आणि प्रशासन यातून शहाणे होऊन कृती करतांना दिसत नाही. अशा प्रकारे दोन विभागांच्या वादातून जनतेच्या जिवाशी खेळणार्या प्रशासनाला जनतेनेच आता जाब विचारायला हवा ! - संपादक) सध्या मिठी नदी कुणाच्या अखत्यारीत येते यावरून उपरोक्त दोन्ही प्रशासनामध्ये विवाद चालू आहे. त्यांच्या या वादामुळे नदीतील गाळ काढण्याचे काम प्रलंबित राहिले आहे. यापूर्वी नदीची जशी स्थिती होती, तशीच आताही होऊ लागली आहे. काही ठिकाणी नदीच्या पात्रातील गाळ काढून तो किनार्यावर तसाच टाकला जातोय, तर दुसरीकडे मिठी नदीच्या किनार्यावर झोपड्यांचे अतिक्रमणही वाढले आहे. अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणांमधील वादामुळे या पावसाळ्यात शहराची वाताहात होईल, याचे भय वाटू लागले आहे.