मुंबई, ३१ मे (वार्ता.) - सावरकरांचा सगळ्यात मोठा पैलू म्हणजे ते अंतर्बाह्य देशभक्त होते. त्यांच्या कवितांमधून त्यांनी देशभक्तीचे स्तवन केले आहे आणि देशभक्ती नावाचा रस मराठी साहित्यात अत्यंत
उदात्त पातळीवर निर्माण केला. देशभक्त असणे म्हणजे काय, तर सर्वप्रथम देशाचा विचार करणे आणि वैयक्तिक विचार मागच्या पायरीवर ठेवणे अन् राष्ट्रीय हित कशात आहे, हे पहाणे. त्यांनी अनेक गोष्टींत राष्ट्रीय हित पाहिलेले आहे, असे प्रतिपादन सावरकर साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद कुळकर्णी यांनी केले. बोरीवली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते सन्माननीय अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर त्यांच्या मनाची जी अवस्था झाली, तेव्हा त्यांतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी जे जे मोठे देशभक्त होऊन गेले त्यांचे स्मरण केले. तसेच गुरु गोविंद सिंग, रामकृष्ण परमहंस यांचे स्मरण केले. शवेटी ते संत तुकारामांना शरण गेले आणि तुकारामांनी त्यांना सांगितले की, ‘अरे तू तुरुंगात राहिलास तर काय झाले. तुला जी आशा वाटते ना की, मी बाहेर पडलो, तर काही तरी करीन ती आशा हेच दुःखाचे कारण आहे. तू देवाला शरण जा.’ यानंतर त्यांनी तुकारामांकडून स्फूर्ती घेतली अन् आत्मानंद हाच खरा आनंद असतो आणि याच एका आधारावर त्यांनी अंदमानातील सर्व दिवस घालवले.
कार्यक्रमस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘गुगल’ने भारताच्या नकाशाचे जे विकृतीकरण केले आहे त्या विरोधात स्वाक्षरी मोहीम कक्ष उभारला होता. या वेळी एकूण ६७५ राष्ट्राभिमान्यांनी स्वाक्षर्या केल्या. या वेळी श्री. अरविंद कुळकर्णी यांनीदेखील कक्षावर येऊन स्वाक्षरी केली.