'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

प.पू. डॉक्टरांचे शिष्यरूप

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने....

शीव गुरुकुलात रहात असतांना प.पू. डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे 

उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, परात्परगुरु प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली. त्यामुळेच प.पू. भक्तराज महाराजांनी त्यांना ‘डॉक्टर, तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले’, असे सांगितले. आम्ही अनुभवलेले त्यांचे हे शिष्यरूपातील वागणे सर्व साधकांसाठी मार्गदर्शक असल्याने येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.


गुरूंच्या आश्रमातील शिष्यरूपी प.पू. डॉक्टरांचा सेवाभाव !
अ. आश्रमात गेल्यावर त्वरित स्वच्छतेच्या आणि इतर सेवेला आरंभ करणे : आश्रमात गेल्यावर इकडे-तिकडे न जाता प.पू. डॉक्टर प्रथम थेट प.पू. बाबांच्या दर्शनाला जात आणि सोबत आलेल्या साधकांनाही त्यांच्या दर्शनासाठी नेत असत. प.पू. बाबांचे दर्शन झाल्यानंतर आश्रम व्यवस्थापनाने रहाण्यासाठी दिलेल्या खोलीत स्वतःचे सर्व सामान ठेवत आणि इतर साधकांचीही रहाण्याची व्यवस्था झालेली आहे का, ते पहात असत. हे सर्व झाल्यावर मग आश्रमातील सेवेला आरंभ होत असे. ते सेवेचा आरंभ कुठून करायचे, तर आश्रमातील शौचालयांपासून. शौचालये, स्नानगृहे स्वच्छ करणे, आश्रमातील सर्व खोल्यांच्या भिंतीवरील जळमटे काढणे, पंखे आणि दिवे स्वच्छ पुसणे, भक्तांच्या चपला एका रांगेत लावण्यासाठी लाकडांच्या फळ्यांचे थर बनवणे, जेवणाच्या वेळी भक्तांना जेवण वाढणे, जेवणाच्या पत्रावळ्या उचलणे, आश्रमाच्या भोवतालचा परिसर स्वच्छ करणे, अशा अनेक सेवा ते स्वतः करत असत.
आ. भर उन्हात आश्रमाच्या परिसरातील काटे आणि मोठमोठे दगड स्वतः उचलणे आणि साधकांकडूनही ते करवून घेणे : त्या काळी कांदळी येथील आश्रमाच्या भोवतालचा परिसर काट्याकुट्यांनी भरलेला असायचा. सर्वत्र मोठमोठे दगड पडलेले असायचे. भर उन्हामधे प.पू. डॉक्टर तो परिसर स्वच्छ करायचे. त्यांच्या हाताला काटे लागायचे, तसेच दगडही वजनदार असायचे; परंतु तरीही ते उचलायचे. आम्ही सर्वजण ही सेवा करतांना मेटाकुटीला यायचो. हाताला काटे लागायचे. वर रखरखते ऊन असायचे. आम्ही दमून जायचो; परंतु प.पू. डॉक्टर न दमता सर्व सेवा स्वतः करायचे आणि आमच्याकडूनही करून घ्यायचे. गुरुसेवा कशी करायची, हे आपल्या प्रत्येक कृतीतून शिष्यरूपातील प.पू. डॉक्टर आम्हा साधकांना शिकवत असत. 
इ. भजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी बैठकव्यवस्थेपासून सर्व सेवा शेवटपर्यंत उभे राहून करणे : प.पू. बाबांच्या भजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आश्रमातील सभागृहामधे गर्दी होत असे. अशा वेळी प.पू. डॉक्टर सर्व भक्तांना बसण्यासाठी जागा करून देणे, मधेच कोणाला पाणी हवे असल्यास ते देणे, कुणाला आणखी काही साहाय्य हवे असल्यास ते देणे, अशा सर्व सेवा ते अव्याहतपणे आणि शेवटपर्यंत उभे राहून करत असत. प.पू. बाबांच्या आरंभीच्या भजनापासून ते शेवटच्या भजनापर्यंत ही सेवा ते न थकता करत असत. प.पू. बाबाही किलकिल्या नजरेने ते काय करतात, हे पहात असत. प.पू. बाबा त्यांना ‘‘बसा’’ म्हणायचे, तेव्हाच ते खाली बसायचे. तोपर्यंत त्यांची सेवा अव्याहतपणे चालू असायची. 
ई. इतर भक्तांची अंथरुणे घालणे आणि घड्या पडल्यास साधकांना योग्य दृष्टीकोन देणे : काही वेळा भजन चालू असतांना भक्तांची झोपण्याची व्यवस्था करावी लागे. अशा वेळी प.पू. डॉक्टर पुढाकार घेऊन ती सेवा आम्हा साधकांकडून करवून घेत. गाद्या घालणे, त्यावर पलंगपोस (चादर) घालणे, अशा सेवा आम्ही करत असू. सेवा पूर्ण झाल्यावर ते पहाण्यासाठी येत. एखाद्या गादीवरील पलंगपोसाची (चादरीची) चुणी (घडी) पडली असल्यास ते आम्हाला ती दाखवून देत आणि ‘येथे नामजप न्यून झाला’, ‘येथे सेवा करतांना मनात दुसरा विचार होता’, असे म्हणून ‘पलंगपोसावर पडलेली एक एक चुणी म्हणजे आपल्या मनातील एक एक विचार आहे’, असे आध्यात्मिक दृष्टीकोन देत आणि ते व्यवस्थित करवून घेत. अशा प्रकारे ते आम्हाला सेवा परिपूर्ण कशी करावी, हे शिकवत असत. - पू. सत्यवान कदम आणि श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, गोवा. (क्रमश:)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi