![]() |
| श्री. संजय मुळ्ये |
एके दिवशी ‘गतवर्षीच्या तुलनेत माझ्या साधकत्वाच्या गुणांमध्ये किती वाढ झाली’, याचा अभ्यास करतांना चांगली साधना करणार्या काही सहसाधकांच्या सहवासाचा परिणाम स्वत:च्या साधनेवर होत आहे, हे माझ्या लक्षात आले. प्रतिदिन लिहिलेल्या शिकायला मिळालेल्या सूत्रांमध्ये त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे अधिक असतात आणि त्यांचे आध्यात्मिक गुण अन् प्रयत्न यांमुळे माझ्या साधनेला गती मिळत असून नकळतपणे त्यांच्यासारखे गुण काही प्रमाणात स्वतःतही वाढत आहेत, याची जाणीव झाली.
गेले दीड वर्ष ग्रंथ-विभागात सेवा करण्यासाठी आल्यानंतर मला साधनेत आणि सेवेतील कौशल्य वृद्धींगत करण्यात सर्वाधिक लाभ झाला, तो श्री. मुळ्येकाका यांचा. काकांच्या संगणकाच्या शेजारी माझा संगणक असल्याने आणि ग्रंथ अन् प्रसारसाहित्य (कला) या विभागांतील सेवा बहुतांश वेळा एकत्रित कराव्या लागत असल्याने काकांचा सतत सहवास लाभतो. त्यांच्या सहवासात त्यांच्यातील लक्षात आलेले पालट आणि गुण पुढे देत आहे.
१. सेवेसाठी वाचनाच्या आवडीला मुरड घालणे
वाचन हा मुळ्येकाकांचा मुख्य आवडीचा विषय; पण गेल्या काही वर्षांपासून ते आवश्यक तेवढेच वाचतात.
अ. बाहेरच्या जगातील बातम्या कळाव्यात; म्हणून ते नियमित दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ वाचायचे. गेल्या महिन्यापासून सेवा वाढल्याने त्यांनी ते वाचणे बंद केले. एरव्ही काका दैनिक वाचायचे म्हणजे भाषा, इतिहास, राष्ट्रपुरुष आदींची कात्रणे नियमित काढायचे. अन्य वृत्तपत्रांतील आपल्या ग्रंथाला आवश्यक असलेले लिखाण काढण्याची सेवा सध्या मी करत असल्याने आता त्या विषयाची सर्व कात्रणेही ते मला काढण्यास सांगतात.
आ. काही वर्षांपूर्वी काकांनी ह.भ.प. हाटेबुवा यांच्या आश्रमातून ‘अध्यात्म’ विषयावरील ‘प्रज्ञालोक’ या मासिकाचे जुने अंक घरी आणले होते. त्या मासिकांवर दृष्टीक्षेप टाकल्यावर ती पुस्तके स्वतः वाचण्यापेक्षा प.पू. डॉक्टरांनी वाचली, तर त्याचा ग्रंथ-निर्मितीसाठी अधिक लाभ होईल, असा विचार करून ती त्यांनी न वाचताच प.पू. डॉक्टरांना आणून दिली. पूर्वीचे काका असते, तर त्यांनी सगळी पुस्तके वाचून काढून मगच आणून दिली असती.
२. स्वत:चा वेळ इतरांसाठी आहे, असा विचार करून इतरांना साहाय्य करणे
ग्रंथ-निर्मिती विभागात काकांव्यतिरिक्त आम्ही ८ साधक सेवा करतो. सगळेच जण वयाने आणि अनुभवाने लहान असल्याने सेवेत आलेली अडचण काकांना येऊन विचारतो. तेव्हा काका हसतमुखाने स्वत:ची सेवा थांबवून आमची अडचण दूर करण्यास प्राधान्य देतात. प्रसारसाहित्याची सेवा करण्यासाठी कला-विभागात बोलवल्यानंतरही ते लगेच हातातली सेवा बाजूला ठेवून तेथे सेवेला जातात. एकदा मी काकांना विचारले, ‘‘सगळे साधक सतत तुम्हाला विचारत अन् बोलवत असतात. त्यामुळे तुमची सेवेतील एकाग्रता न्यून तर होत नाही ना ? ’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण इतरांसाठी आहोत’, असा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो. त्या साधकाची अडचण सुटल्याने त्याची सेवा पुढे जाणार आहे. माझी आणि त्याची सेवा शेवटी एकच आहे. त्यामुळे कोणीही सेवेत साहाय्य मागण्यासाठी आल्यावर मी नकार देत नाही.’’ काकांच्या या वाक्याचा माझ्या मनावर खोलवर प्रभाव पडला आणि मीही दैनिक, कला, ग्रंथ, संकेतस्थळ आदी विभागांत साहाय्य मागितल्यावर तत्परतेने ते देण्याचा प्रयत्न करू लागलो.
३. प्रेमभाव
हा काकांचा स्थायीभाव आहे. काकांच्या वागण्या-बोलण्यातून तो सहजपणे प्रगटतो. काकांनी त्यांच्या संगणकाच्या पटलावर साधकांसाठी खाऊच्या गोळ्यांचे तीन डबे ठेवले आहेत. काका घरून येतांना साधकांसाठी
नेहमी गोळ्या आणतात आणि त्या तीन डब्यांमध्ये विभागणी करून ठेवतात. साधकांना भूक लागली किंवा ग्लानी येत असेल, तर साधक काकांच्या पटलाजवळ जाऊन त्या गोळ्या खातात. या तीन डब्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते डबे कधीही रिकामे नसतात.
अ. जेवण आणि अल्पाहार यांसाठी उठतांना काका प्रेमाने आम्हाला ‘‘चला जेवायची वेळ झाली जाऊया’’, असे म्हणतात आणि सोबत घेऊन जातात.
आ. एखाद्या साधकाची चूक लक्षात आली, तर काका नंतर प्रेमाने, हसतमुखाने आणि सहज शब्दांमध्ये सांगतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेली चूक लक्षात रहाते.
४. चुकांविषयी गांभीर्य
एकदा झालेली चूक पुन्हा न होण्यासाठी ते आग्रही असतात. त्यामुळे त्यांची सेवा परिपूर्ण होते. एखाद्या ग्रंथाची वा प्रसारसाहित्याची सेवा पूर्ण झाल्यावर त्यात झालेल्या चुका ते लगेच फळ्यावर लिहितात आणि नंतरच नवीन सेवेला आरंभ करतात.
अ. एकदा श्री. रोहित साळुंके यांनी काकांना ग्रंथ-र्निमिती विभागाची बैठक घेण्यास सांगितले. काकांनी हसत ‘‘मला ते जमणार नाही’’, असे सांगितले. बैठक झाल्यानंतर काकांनी लगेच फळ्यावर चूक लिहिली, ‘मी बैठक घेण्याची सेवा शिकण्याची संधी गमावली.’ ते झालेल्या चुकीविषयी काही क्षणांतच अंतर्मुख झाले.
आ. काका दिवसभरात ३-४ वेळा स्वभावदोषांची सारणी लिहितात. सेवा चालू असतांना त्यांच्या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेत कुठेही खंड पडत नाही.
५. चुकांची खंत वाटणे
एका ग्रंथाच्या अनुक्रमणिकेत झालेली एक चूक प.पू. डॉक्टरांनी दाखवल्यानंतर मुळ्येकाका क्षणभर सेवा परिपूर्ण न झाल्याने व्यथित झाले. तेव्हा त्यांच्याकडून परिपूर्ण सेवेचा ध्यास शिकायला मिळाला.
६. सहसाधकांना प्रशिक्षण देणे
ग्रंथ आणि कला यांविषयी सेवा करतांना त्यात त्यांना काही नवे शिकायला मिळाल्यास ते काका लगेच टिपून ठेवतात. संबंधित सेवा करणार्या साधकालाही ती सूत्रे आवर्जून सांगतात.
अ. मुळ्येकाका यांनी कला आणि ग्रंथ विषयक सेवांतील धोरणांच्या धारिकाही सिद्ध केल्या आहेत. याविषयी ते एकदा म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांनी लिहून ठेवलेल्या पुष्कळ ग्रंथांच्या लिखाणाचे आपल्याला संकलन करायचे आहे. त्यासाठी संकलन करणारे अनेक साधक लागतील. नवीन साधक ही सेवा करायला आल्यावर त्यांना या धारिकांचा लाभ होईल.’’
आ. मी विविध विषयांवरील जागृतीपर पत्रकांचे लिखाण करायला शिकत असतांना ते पडताळण्यासाठी श्री. मुळ्येकाका यांना द्यायचो. ते पडताळून झाल्यावर त्यातील चुकांचा माझा अभ्यास करून घेण्यासाठी ते स्वतः १०-१५ मिनिटे वेळ काढायचे. लिखाणाचे संकलन करतांना होणार्या बारीक-बारीक चुकांचा अभ्यास करून घ्यायचे. गेल्या वर्षभरात अनेक वेळा काकांनी ग्रंथ, प्रसारसाहित्य आदी सेवांमध्ये माझा असा अभ्यास करून घेऊन माझी भाषा, मांडणी, संकलन आणि संपादन सुधारले. ‘माझ्याकडून परिपूर्ण गुरुसेवा व्हायला हवी’, याविषयी ते माझ्यापेक्षा जास्त आग्रही असतात. आज सेवेमध्ये मला काकांनी घेतलेल्या परिश्रमांचा लाभ होत आहे.
इ. मी एका ग्रंथाचे प्रथमच अंतिम संकलन केल्यानंतर काकांनी ती सेवा केल्यानंतर करावयाची पडताळणी सूची स्वतः वेळ काढून शिकवली. तेव्हा नवीन शिकणार्या साधकाला शिकतांना कोणतीही अडचण येऊ नये, असा त्यांचा दृष्टीकोन होता.
ई. मी, श्री. गिरीधर वझे आणि कु. गायत्री बुट्टे ग्रंथ-संकलनाची सेवा शिकत असल्याने श्री. मुळ्येकाका प्रतिदिन ‘सहसाधकांनी शिकावे आणि व्यवस्थित सेवा करावी’, यासाठी प्रार्थना करतात आणि मलाही तसे करायला सांगतात.
७. साधकाच्या साधनेचेही दायित्व घेणे
एरव्ही सेवेविषयी बोलणारे; पण साधनेच्या अन्य अंगांविषयी अधिक चर्चा न करणार्या मुळ्येकाकांमधील महत्त्वाचा पालट म्हणजे विभागात शिकण्यासाठी आलेल्या एका साधिकेच्या सेवेचे आणि साधनेचे दायित्व त्यांनी स्वीकारले.
८. शरणागतभाव
एकदा काकांनी सांगितले, ‘‘सेवा करतांना शरणागतभाव टिकून रहाण्यासाठी ‘तुम्ही सेवा करून घ्या, हे मला जमत नाही’, अशी मी प.पू. डॉक्टरांना सतत प्रार्थना करतो.’’ ग्रंथाचे संकलन झाल्यावर ‘प.पू. डॉक्टरांमुळेच तो झाला आहे’, असा त्यांचा भाव असतो.
९. स्वतःच्या साधनेविषयी अंतर्मुखता
मुळ्येकाकांमध्ये व्यवस्थितपणा, नियोजनबद्धता, अभ्यासूवृत्ती या गुणांसह वर दिलेले आध्यात्मिक गुण आहेत आणि त्यांचे प्रयत्न चांगले दिसून येतात. त्यांची ६० टक्के पातळी झाली असावी, असे एक दिवस वाटल्याने मी त्यांना म्हटलो, ‘‘काका, या गुरुपौर्णिमेला ६० टक्के पातळी होईल ना !’ काका सहजभावाने म्हणाले, ‘‘कठीण आहे; पण स्वत:च्या मनात कसे विचार आहेत, यावरून स्वत:ची पातळी ठरते. मनात कोणत्या पातळीचे विचार असतात आणि आदर्श विचार यांचा मी अभ्यास करतो.’’ त्यांच्या बोलण्यातून त्यांची अंतर्मुखता दिसली.’
- श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. मायेपासून अलिप्त होता येते !
२. जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सुटून महालोकात स्थान प्राप्त होते !
३. वाईट शक्तींचे त्रास असणार्या साधकांवर उपाय करता येतात !
४. मनोलयाला आरंभ होतो आणि विश्वमनातील विचार ग्रहण करता येतात !
‘व्यक्तीगत साधनेसोबतच पुढील साधना करावी.
१. साधकांना व्यष्टी साधनेबद्दल मार्गदर्शन, तसेच स्वतः समष्टी साधनेतील असल्यास त्यासंदर्भात मार्गदर्शन
२. समष्टीसाठीचा नामजप
३. आवश्यकता भासल्यास त्रास असलेल्या साधकांवर उपाय’
- डॉ. आठवले (भाद्रपद शु. १४, कलियुग वर्ष ५११२ (२२.९.२०१०))
६० टक्के पातळी गाठलेल्या साधकांची वैशिष्ट्ये
१. मायेपासून अलिप्त होता येते !
२. जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सुटून महालोकात स्थान प्राप्त होते !
३. वाईट शक्तींचे त्रास असणार्या साधकांवर उपाय करता येतात !
४. मनोलयाला आरंभ होतो आणि विश्वमनातील विचार ग्रहण करता येतात !
६० टक्के पातळी झालेल्या साधकांनी करावयाची साधना
‘व्यक्तीगत साधनेसोबतच पुढील साधना करावी.
१. साधकांना व्यष्टी साधनेबद्दल मार्गदर्शन, तसेच स्वतः समष्टी साधनेतील असल्यास त्यासंदर्भात मार्गदर्शन
२. समष्टीसाठीचा नामजप
३. आवश्यकता भासल्यास त्रास असलेल्या साधकांवर उपाय’
- डॉ. आठवले (भाद्रपद शु. १४, कलियुग वर्ष ५११२ (२२.९.२०१०))
