![]() |
| श्री. लक्ष्मीशा गब्लडका |
कर्नाटक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रामाणिकपणे कार्य करणारे श्री. लक्ष्मीशा गब्लडका हे काही काळाने संघावरील राजकीय प्रभावामुळे दु:खी झाले. देवतांपेक्षा राष्ट्राला प्राधान्य देणे, धर्माला दुय्यम स्थान देणे आदी संघातील शिकवण मुळातच साधकवृत्ती असलेल्या श्री. गब्लडका यांना असाहाय्य झाली. सध्या ते कर्नाटकात हिंदु जनजागृती समितीच्या समवेत हिंदु धर्मजागृतीचे कार्य करत आहेत. त्यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिली, तेव्हा त्यांची ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. नित्यानंद भिसे यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत.
सनातनचे आश्रम सांप्रदायिक मठांसमोर आदर्श !
सनातनच्या आश्रमात आल्यावर खूप आनंद आणि शांत वाटले. चैतन्याची अनुभूती आली. ही अनुभूती शब्दातीत आहे. इथे आल्याने मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी योग्य मार्गदर्शन प्राप्त झाले. आश्रमात प्रेमभाव, ईश्वराप्रती असलेला भाव असलेले साधक पाहून मी प्रभावित झालो. इथे साधक खूप उच्च संस्कारात रहात आहेत. या ठिकाणी सत्ययुगातील वातावरण आहे, हाच शब्दप्रयोग या आश्रमाचे वर्णन करण्यासाठी योग्य होऊ शकतो. आश्रमात येण्यापूर्वी माझे नामस्मरण यांत्रिक पद्धतीने चालू होते; तसेच ते खंडीत स्वरूपात चालू होते. आश्रमात आल्याबरोबर भावपूर्ण नामस्मरण होऊ लागले, विचारशून्य अवस्था, सतत वर्तमान स्थिती अनुभवयास मिळाली. या आश्रमात सेवा करणार्या कोणत्याही साधकाच्या चेहर्यावर निराशा दिसत नाही, सर्वच जण आनंदी आहेत. कर्नाटकातील धर्माचा प्रसार करणारे अनेक सांप्रदायिक मठ आहेत. त्यांच्यासाठी हा आश्रम आदर्श आहे.
प.पू. डॉक्टर यांना भेटणे हा आयुष्यातील सर्वांत पवित्र क्षण !
प.पू. डॉक्टरांना मी भेटलो, तेव्हा त्यांनी येथे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश हे पंचतत्त्व प्रकट होत असलेल्या अनुभूती सांगितल्या, त्या जाणून कृतार्थ झालो. आता कृष्णतत्त्व जागृत होत असल्याने धर्मलढा मोठ्या प्रमाणात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्यांच्या मनात धर्माच्या प्रती थोडी जरी आस्था असेल, त्यांना सध्या किती योग्य दृष्टीकोनाची आवश्यकता आहे, हे मला त्यांच्या सहवासातून जाणवले. प.पू. डॉक्टर यांच्यासारख्या गुरूंचे दर्शन होणे, हा क्षण मी आयुष्यातील पुण्याचा आणि पवित्र क्षण समजतो.
संघातील शारीरिक आणि वैचारिक विकासापेक्षा आध्यात्मिक विकास महत्त्वाचा !
पहिल्यापासून मी जरी संघात कार्य करत असलो, तरी ध्यानधारणा करत होतो. संघात तशी शिकवण मिळत नाही, तसेच प्रोत्साहन मिळत नाही. संघात केवळ शारीरिक आणि वैचारिक विकास घडला; पण त्याहून पुढे आध्यात्मिक प्रगती आवश्यक आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी स्वभावदोष, अहंनिर्मूलन प्रक्रिया ही शतप्रतिशत आवश्यक आहे. सनातनचे हेच खरे वैशिष्ट्य आहे. आजवर मी जे करत होतो, त्यातून समाधान मिळत नव्हते; पण आता मला येथे आल्यापासून समाधान प्राप्त झाले आहे. हिंदु जनजागृती समितीमध्ये कार्य करतांना आनंद मिळाला.
संघ अधार्मिक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो !
संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये धर्मश्रद्धा नाही. भावनाप्रधानता प्रचंड आहे. संघावर राजकीय प्रभाव खूप आहे. केवळ मुसलमान आणि खिस्ती यांचा विरोध करणे हेच हिंदुत्व, असे संघ समजतो. संघात श्रीराम, श्रीकृष्ण, गोमाता, गंगामाता यांना दुय्यम स्थान आणि राष्ट्राला प्रथम स्थान आहे. त्यामुळेच संघाला धर्माचे अधिष्ठान प्राप्त झाले नाही. संघ प्रत्येक विषय हा स्वार्थासाठी संघटनेच्या उभारणीसाठी वापरत असतो. म्हणून राममंदिर विषय बाजूला राहिला आणि त्या विषयाच्या नावाखाली संघटना वाढवण्याचा प्रयत्न संघाने केला. सूर्यग्रहणाच्या वेळी संघ स्वयंसेवकांची पदयात्रा आयोजित करते, स्वयंसेवकांना भोजन देते. असे अधार्मिककृत्य संघ जाणीवपूर्वक
करतो. यावरून ते धार्मिक गोष्टींना अधिक महत्त्व देत नाहीत, असे दाखवण्याचा प्रयत्न करतात.
भाजप शासन मंदिरे पाडत असतांना संघाची निष्क्रियता !
कर्नाटकात भाजप शासनाने ५ सहस्त्र मंदिरांना अनधिकृत म्हणून घोषित केले, तेव्हा संघ आणि परिवारातील कोणत्याही संघटनेने विरोध केला नाही. तसेच कर्नाटक शासनाने ३५० मंदिरे तोडली, तरीही संघ परिवाराने त्या विषयी अवाक्षर उच्चारले नाही. संघाचे अपत्य असणार्या भाजपच्या राज्यात मंदिरांचे पैसे मुसलमानांच्या उत्सवाला राज्यात गोहत्या झाली, धर्मांतर झाले, तर कोणीही आक्षेप घेऊ नका, असे संघ कार्यकर्त्यांना सांगतो; कारण त्यामुळे तेथील भाजपच्या शासनाची प्रतिमा मलिन होईल, असे संघ सांगतो, हे दुदैव आहे. कर्नाटकात ‘कुकेसुब्रह्मण्यम’ हे खूप जागृत देवस्थान आहेत. तेथे ५ मुसलमान विश्वस्त सदस्य आहेत. ‘कोल्लुरुमोकांबिका’ देवस्थान हेही मोठे आणि अत्यंत जागृत आहे. त्या न्यासातील १० लक्ष रुपये मुसलमानांच्या उरूसाला देण्यात आले, तेथील भाजपच्या राजवटीत हिंदूंच्या मंदिरांची अशी अवस्था आहे.
स्वतःच्या कार्याचा संघाकडून खोटा प्रचार !
प्रत्येक तालुक्यात प्रती आठवड्यात संघाचे प्राथमिक शिक्षावर्ग चालतात. तेथे ५०-६० जण येतात, असे संघ सांगतो. तसेच वर्षातून एकदा जिल्हास्तरीय संमेलन भरवतो, तेव्हा ५ ते ६ सहस्त्र स्वयंसेवक जमतात, असेही संघ सांगतो. यात किती तथ्य आहे, याविषयी शंका आहे.
समितीच्या कार्यकर्त्यांमधील निष्काम सेवाभाव, भक्तीभाव हे इतर संघटनासाठी आदर्श !
या उलट हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची संख्या अल्प असली तरी त्यांचे कार्य मोठे आहे. या कार्याची व्याप्ती दिसते. जेव्हा कर्नाटक शासनाने हिंदूंची मंदिरे अनधिकृत असल्याचे घोषित केले, तेव्हा जर समितीने विरोध केला नसता, तर ती मंदिरे कधीच उद्ध्वस्त झाली असती. समितीच्या आंदोलनामुळेच तेथील मंदिरे सुरक्षित राहिली. समितीचे धर्मशिक्षण वर्ग म्हणजे आध्यात्मिक क्रांतीच आहे. जर अध्यात्म किंवा धर्म यांविषयी माहिती घ्यायची असेल, तर सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समितीकडे जावे, अशी भावना आता कर्नाटकातील सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. समितीच्या कार्यकर्त्यांमधील निष्काम सेवाभाव, भक्तीभाव हे इतर संघटनांसाठी आदर्श आहे.
