'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

प.पू. सत्यसाईबाबांची 'ती' भेट

प.पू. सत्यसाईबाबांकडून होणारे चमत्कार आणि त्यातून निर्माण होणारे वादविवाद हे जसे कायम चर्चेत राहिले तेवढे त्यांनी उभे केलेले समाजोपयोगी, गोरगरिबांना साहाय्य करण्यासाठीचे काम मात्र कधीच चर्चेत आले नाही. प.पू. सत्यसाईबाबांच्या या चमत्कारांवर टीका करणारे तथाकथित सुधारणावादी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, शाम मानव आणि बुद्धीवादी यांनीही प.पू. बाबांच्या या कार्याकडे कधीही लक्ष दिले नाही. काही वर्षांपूर्वी मुंबईतील काही वरिष्ठ पत्रकारांनी प.पू. बाबांची भेट घेतली. त्या वेळी घडलेले प्रसंग आणि त्याविषयी जाणवलेल्या गोष्टी त्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि आताचे दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक श्री. दिनेश रायकर यांनी लिहिलेला दैनिक ‘लोकमत’मधील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.


संतांच्या चमत्काराकडे शोधपत्रकारितेच्या दृष्टीने पहाण्याचा प्रयत्न
प.पू. सत्यसाईबाबांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील विविध वर्तमानपत्रांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पुट्टपर्थीला नेण्याची योजना प.पू. सत्यसाईबाबांवर श्रद्धा असणार्‍या ‘कॅनको अ‍ॅडर्व्हटायझिंग’चे रमेश नारायण आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे अधिकारी जोशी यांनी आखली होती. या दौर्‍यात माझ्यासह दैनिक ‘नवभारत टाइम्स’चे त्यावेळचे संपादक विश्वनाथ सचदेव, ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे एस्. बालकृष्णन्, ‘महाराष्ट्र
टाइम्स’चे अशोक जैन, ‘बिझनेस इंडिया’चे सरोष बाना, ‘मुंबई समाचार’च्या पिंकी दलाल, ‘इंडियन एक्सप्रेस’चे वरिष्ठ व्यवस्थापक राजा राव यांचा समावेश होता. त्यात मीही एक होतो. जातांनाच आम्ही सगळ्यांनी त्यांना कोणकोणत्या ‘अँगल’ने तपासून पाहायचे याचे आडाखे बांधले होते. कोणी खुर्चीकडे लक्ष ठेवायचे, कोणी हाताकडे तर कोणी लांब हाताच्या बाह्यांकडे लक्ष द्यायचे हेही आम्ही ठरवले होते. प.पू. सत्यसाईबाबांनी देखील आमच्या या पत्रकारांच्या गटासाठी एक घंटा वेळ ठेवला होता. बाहेर लाखोंची गर्दी असतांना देखील त्यांनी तो वेळ ठेवला होता. बाबा ज्या खोलीत बसतात तेथे आम्ही सगळे गेलो. एक साधी लाकडी खुर्ची होती. तीदेखील आम्ही आधी तपासली होती. कारण त्या खुर्चीच्या दांडीला कुठे अंगठी, सोन्याची साखळी तर लपवली नाही ना, अशी आमची शोधपत्रकारिता तेथे पार पडली.
पत्रकाराच्या बोटापेक्षा मोठी झालेली अंगठी बोटाच्या मापाप्रमाणे करून देणे
आम्ही सगळे खुर्ची समोरील सतरंजीवर बसलो. काहीवेळाने प.पू. बाबांचे आगमन झाले. स्मितहास्य करत, ‘‘काहीही विचारा, दिलखुलासपणे बोला’’, असे म्हणत त्यांनी सुरुवात केली. स्वत:हून त्यांनी आपली दिनचर्याही आम्हाला सांगितली. ‘‘मी झोपत नाही, केवळ एका अंगावर डोळे उघडे ठेवून विसावतो, दिवसभर जेवत नाही, गूळ-शेंगदाण्याचा एक लाडू खातो. मी ९३ वर्षे जगणार आहे; पण त्याआधी दुसर्‍या साईने कुठेतरी जन्म घेतलेला असेल...’’, असे ते खूप काही बोलले. बोलता बोलता त्यांनी हवेत हात फिरवला आणि एक हिरव्या खड्याची अंगठी रमेश नारायण यांना दिली. आमच्या गप्पा चालू होत्या. त्याचवेळी अंगठी आल्याने आम्ही आणखी शोधक नजरेने त्यांच्याकडे पहात बोलत होतो. पुन्हा त्यांनी क्षणात दुसरी अंगठी काढून बालकृष्णन् यांना दिली. ती त्यांच्या बोटात जात नव्हती. सरोष बाना यांनी ती अंगठी बालकृष्णन् यांच्याकडून घेतली आणि स्वत:च्या बोटात घातली. मात्र त्यावर बालकृष्णन् यांनी पत्रकारी भाषेत ती अंगठी मला दिली आहे असे ठासून सांगितले. मग प.पू. सत्यसाईबाबांनी ती अंगठी बाना यांच्याकडून परत घेतली. सगळ्यांच्या देखत ती दोन बोटात धरून त्यावर नऊवेळा फुंकर घातली आणि तीच अंगठी नवरत्नाची झाली. ती त्यांनी बालकृष्णन यांना दिली, जी त्याच्या बोटात अगदी माप घेतल्यासारखी व्यवस्थित बसली देखील !
भक्तांशी सूक्ष्मातून संवाद साधणारे प.पू. सत्यसाईबाबा !
विश्वनाथ सचदेव मागेच बसले होते. ‘‘हम भी पिछे बैठे है स्वामीजी !’’ असे ते म्हणाले. मात्र बाबांनी तिकडे दुर्लक्ष केले. चर्चा पुढे चालूच होती. बोलता बोलताच त्यांनी पिंकी दलाल यांच्यासाठी सोन्याची साखळी काढून दिली. घंट्याभराची चर्चा संपत आली तसे ते सरोष बाना यांना म्हणाले, ‘‘आप नाराज मत होना !’’ आणि त्यांनाही बाबांनी अंगठी दिली जी त्यांच्या बोटात व्यवस्थित बसली ! बोलता बोलता ते हवेत हातवारे करत असत. त्यावर विश्वनाथ यांनी विचारले देखील, ‘‘आप ऐसे हवा में हाथ क्यों उडाते हो ! अच्छा नहीं दिखता !’’ त्यावर ते म्हणाले होते, ‘‘ माझ्या समोर जे भक्त नाहीत; पण जे माझा मनापासून धावा करत आहेत त्यांच्याशी मी त्याद्वारे संवाद साधत असतो.’’
निधर्मीवादी पक्षातील केंद्रीय मंत्र्याची प.पू. बाबांवर श्रद्धा !
काही वेळाने आम्ही सगळे खोलीच्या बाहेर आलो. बाहेर त्यावेळचे केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर बसलेले होते. अन्य राज्यातून आलेले असंख्य मान्यवर होते. नंतर शिवराज पाटील यांच्याशी गप्पा मारतांना ते आम्हाला म्हणाले, ‘‘येथे आल्यामुळे मला मन:शांती मिळते, माझी सतत उन्नती होत गेली आहे.’’ त्यांचे व्याही देखील तेथे होते. ते नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांनीही तीच भावना व्यक्त केली होती. 
पत्रकाराने मद्यपान आणि मांसाहार त्यागणे 
कोणाच्या तरी बोटाच्या मापाची अंगठी आपल्या डोळ्यादेखत समोर येते कशी आणि फुंकर घालण्याने तीच नवरत्नाची कशी होते, हा वैज्ञानिक प्रश्न आजही मला सतावतो. मात्र जे बालकृष्णन् विचाराने लेनिनवादी, मार्क्सवादी होते, जे नियमित मद्यप्राशन करायचे, मांसाहार आवडीने खायचे त्यांनी या भेटीनंतर आजतागायत ना कधी मद्याला हात लावला ना मांसाहाराला !
प.पू. बाबांनी दिलेली अंगठी हरवणे आणि पुन्हा सापडणे
कालांतराने एकदा बालकृष्णन स्वत:च्या कार्यालयामध्ये काम करत असतांना त्यांच्या बोटातून अंगठी गळून बाजूच्या केराच्या बादलीमध्ये पडली. रात्री घरी गेल्यावर हे त्यांच्या लक्षात आले. सकाळी लवकर उठून ते कार्यालयामध्ये आले. तर सगळे कार्यालय स्वच्छ झालेले होते. मात्र त्यांची केराची बादली तशीच होती. स्वच्छ न केलेली आणि त्यात त्यांना ती अंगठी सापडली. नंतर ही गोष्ट बालकृष्णन् यांनीच मला सांगितली.
चमत्काराकडे लक्ष देतांनाच साधनाही आवश्यक !
प.पू. बाबांचे पार्थिव अनंतात विलीन झाले; पण जे पाहिले, जे अनुभवले तो सगळा पट आजही डोळ्यासमोर आहे. अगदी काल घडल्यासारखा... चमत्कारांच्या बाबतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन जसा मला छळत राहिला तसाच त्याच्या दुसर्‍या बाजूने वेगळा दिलासाही दिला. ज्ञानदेवांनी भिंत चालवली किंवा रेड्याच्या तोंडून वेद वदवले म्हणून शहाण्या माणसाने ज्ञानेश्वरीला हातच लावायचा नाही की काय ? (साभार : दै. लोकमत, २७.४.२०११)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi