इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्यात सर्व सद्गुणांचा उत्कर्ष झाला आहे. दया, क्षमा, शांती अशा अनेकानेक गुणसमुच्चयाला मिळून आपण माणुसकी म्हणायला लागलो आहोत. मनुष्य मनोनिग्रह करायला लागला आहे आणि ते लक्षात घेऊन आधुनिक नीतीशास्त्राचे नियम बनले आहेत; परंतु मनुष्याच्या स्वार्थ प्रवृत्तीचे काय करायचे हा प्रश्न अजून पूर्णांशाने मिटलेला नाही. तो न मिटण्याचे कारण पाश्चात्त्य विचारसृष्टी केवळ बाह्य गोष्टींचा विचार करते; अध्यात्मशास्त्राचा विचार करीत नाही, असे टिळकांना वाटते.
लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, समादेशक संपादक, सनातन प्रभात, मुंबई.
मानसिक क्रांती व्हावी म्हणून टिळकांनी ‘गीतारहस्य' लिहिणे
भारतावर इंग्रजांचे राज्य आले आणि सर्वप्रथम बुद्धिभ्रम बुद्धिमंतांचा झाला. आपण सर्वार्थाने मागासलेले आहोत; कारण आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान सदोष आहे, असा विकल्प त्यांच्या मनात निर्माण झाला. टिळकांना जसा सामान्य माणूस ताठ उभा करायचा होता तसे तो आणि बुद्धीमंत यांच्यातील मूलभूत विचारांमधील अंतर त्यांना कमी करावयाचे होते. तेव्हा हिंदूंची जीवनविषयक दृष्टी शतकानुशतके ज्ञानी तपस्व्यांनी घासूनपुसून लख्ख केलेली आहे; मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ आहे हा विश्वास त्यांनी इंग्रजी शिकलेल्या तरुणांमध्ये निर्माण करायचे ठरविले. हिंदूंची प्रत्येक गोष्ट शास्त्रशुद्ध आणि म्हणून विज्ञानाच्या आणि नीतीच्या दृष्टीने न्याय्य असते हे पटले, तर युवकांना इंग्रजांकडे मान वर करून बघण्याचे धैर्य प्राप्त होईल, असे टिळकांना वाटत होते. शत्रुकडे मान वर करून बघण्याने निम्मी लढाई पार केलेली असते हा नियम आहे. ती मानसिक क्रांती व्हावी म्हणून टिळकांनी ‘गीतारहस्य' लिहिले. कृष्णाला गीतेतून अर्जुनाला काय सांगायचे आहे त्याचे सतत चाळीस वर्षे ते चिंतन करीत होते हा त्यांच्यातील आणि आजच्या राजकीय नेत्यांमधील फरक आहे. जनतेची मानसिक स्थिती उर्जितावस्थेला नेण्यापेक्षा तिच्या संभ्रमित मानसिकतेचा लाभ उठवून तिच्या स्वामित्वाचा कोट्यवधी रुपयांचा निधी आपल्या घशाखाली कसा घालता येईल, याचे चिंतन आजचे पुढारी करीत असतात; पण त्यावर टीका करण्याचा किती पत्रकारांना नि विचारवंतांना हक्क आहे हाही विषय चिंतनीय आहे.
प्रकरण चौथे : ‘आधिभौतिक सुखवाद'
समरभूमीवर अर्जुनाला पडलेले प्रश्न हे त्याचे एकट्याचे नसून प्रातिनिधिक आहेत. प्रत्येक हिंदूला कधीना कधी या प्रश्नांनी अस्वस्थ व्हायला होते. माणूस म्हणून माझी कर्तव्ये काय आणि ती लक्षात घेऊन कौरवांशी लढणे न्याय ठरेल काय या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत पृथ्वीचेच काय पण तिन्ही लोकाचे राज्य मिळणार असेल, तरी धनुष्याला प्रत्यंचा लावायला अर्जुन उत्सुक नव्हता. त्या अनुषंगाने टिळकांनी कर्तव्य नि सुख या विषयांची चर्चा ‘आधिभौतिक सुखवाद' या चौथ्या प्रकरणात केली आहे. नीतीशास्त्राचा विचार करतांना पाश्चात्त्य विचारवंत केवळ बाह्य लक्षणांचा कसा विचार करतात आणि अध्यात्म कसे अजिबात विचारात घेत नाहीत, याचा त्यांनी प्रथम उहापोह केला आहे. सुखप्राप्ती आणि दु:ख निवारण यासाठी प्रत्येक माणूस जगत असल्यामुळे त्याला धरून नीतीशास्त्र बांधले पाहिजे, असे हे विचारवंत मानतात. मनुष्य हा स्वार्थी असून विषयसुखाच्या मुशीत ओतलेला पुतळा आहे, असे सूत्र त्यांनी धरले आहे आणि स्वार्थी माणसाचे प्रकार पाडले आहेत. काही माणसे आतूनबाहेरून पूर्णपणे स्वार्थी असतात. काही माणसे भविष्यात दुसर्या माणसाने आपल्या स्वार्थावर आघात करू नये म्हणून सावधपणे दुसर्यांशी कधीकधी काळवेळ पाहून चांगले वागण्याचा प्रयत्न करतात. अर्थात हे वर्तनही स्वार्थीपणाचेच असते. टिळकांनी भवभूतीचा एक श्लोक उद्यृत केला आहे. स्वार्थाचा विचार न करता जे दुसर्याच्या भल्याचा विचार करतात नि तसे वागतात ते सर्वश्रेष्ठ होत. काही माणसे स्वार्थ सांभाळून दुसर्याचे करता येईल तेवढे भले करतात. काही माणसे स्वार्थासाठी दुसर्याचे वाईट करायला केव्हाही सिद्ध असतात; पण काही माणसे कारण असो वा नसो दुसर्याचे सतत वाईट चिंतत असतात. अशा लोकांना काय म्हणावे हे आपल्याला कळत नाही, असे भवभूतीने म्हटले आहे. आपल्याकडे ऋण काढून सण साजरा करावा आणि सतत मजेत रहावे, दुसरे काय म्हणतील याचा विचार करू नये, असे सांगणारा चार्वाक होऊन गेला. राज्योपभोग मिळणार असेल तर पापपुण्याचा आणि न्यायान्यायाचा विचार न करता कौरवांना ठोकून काढ, असे रामायणातला जाबाली अर्जुनाला भेटला असता तर त्याने सांगितले असते, असे टिळकांनी लक्षात आणून दिले आहे. सर्व कर्मे स्वार्थपर असल्याने त्याज्य होत, असे संन्यासमार्गी म्हणत असतातच याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
पाश्चात्त्य विचारसृष्टी केवळ बाह्य गोष्टींचा विचार करते; अध्यात्मशास्त्राचा विचार करीत नाही, असे टिळकांना वाटणे
थोडक्यात सांगायचे तर स्वार्थ ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे, असे मानून चालण्यात चूक होते. दृष्टी थोडी व्यापक करावी आणि पुष्कळांचे पुष्कळ सुख साधण्याइतका स्वार्थ थोडा मोठा करावा असा उपाय त्यावर पाश्चात्त्यांनी काढला. घुबडाला उजेड आवडत नाही म्हणून सगळ्यांना अंधारात रहाता येत नाही हे तत्त्व त्यामागे आहे; परंतु पुष्कळांचे पुष्कळ सुख हे तत्त्व वापरायचे म्हटले, तर पांडवांचे सात औक्षहिणी आणि कौरवांचे अकरा औक्षहिणी सैन्य होते आणि पराभवाचे दु:ख संख्येने अधिक असल्याने कौरवांचे मोठे होणार होते. तेव्हा वैचारिक कोंडी झाल्याने मनुष्य खरोखर स्वार्थी आहे का याचा पुनर्विचार सुरू झाला. कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असल्याने कर्त्याच्या बुद्धीपासून नीतीशास्त्राची सुरुवात करा, असे कान्ट प्रभृती विचारवंत सांगू लागले. संतती निर्माण करणे आणि तिच्या संगोपनार्थ स्वार्थ बाजूला सारून झिजण्यास सिद्ध होणे ही माणसाची अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्यात सर्व सद्गुणांचा उत्कर्ष झाला आहे. दया, क्षमा, शांती अशा अनेकानेक गुणसमुच्चयाला मिळून आपण माणुसकी म्हणायला लागलो आहोत. मनुष्य मनोनिग्रह करायला लागला आहे आणि ते लक्षात घेऊन आधुनिक नीतीशास्त्राचे नियम बनले आहेत; परंतु मनुष्याच्या स्वार्थ प्रवृत्तीचे काय करायचे हा प्रश्न अजून पूर्णांशाने मिटलेला नाही. तो न मिटण्याचे कारण पाश्चात्त्य विचारसृष्टी केवळ बाह्य गोष्टींचा विचार करते; अध्यात्मशास्त्राचा विचार करीत नाही असे टिळकांना वाटते.
याज्ञवल्क्य आणि त्याची पत्नी मैत्रेयी यांच्यातील संवादाचा सारांश
येथे टिळकांनी याज्ञवल्क्य आणि त्याची पत्नी मैत्रेयी यांचा संवाद दिला आहे. त्याचा सारांश असा की दुसर्यात आपल्याला पहाणे आणि आपल्यात दुसर्याला पहाणे अशाप्रकारे हिंदूंनी स्वार्थ आणि परार्थ यांच्यातील द्वैत संपवले आहे. आई मुलावर प्रेम करते कारण मुलामध्ये ती स्वत:ला पहात असते. तिच्या एकूण विश्वाविषयीच्या ज्या कल्पना आहेत किंवा स्वप्ने आहेत त्या ती मुलात पहात असते. अर्जुन कौरवात स्वत:ला पहात असतो आणि स्वत:त कौरवांना पहात असतो. त्याची दृष्टी अद्वैताची असते. म्हणून त्याला त्याच्या आत्म्याचा निर्णय हवा असतो. तो निर्णय कसा घ्यावा हे गीतेत सांगितले आहे. मुसलमानांचे विषयात हिंदूंची दृष्टी अशी अद्वैताची आहे. म्हणून मुसलमान हिंदूंशी प्रत्येक गोष्टीत इतके वाईट वागूनही हिंदूंनी त्यांचे विषयातील सहोदरभाव सोडलेला नाही. त्याचा अर्थ मुसलमानांचे पाय धरायला हिंदू उत्सुक आहेत असे नाही. गांधीवाद मुसलमानांचे लांगूलचालन हा अंधश्रद्धेचा विषय मानतो; पण या देशात सावरकरवाद नावाची गोष्ट अजून प्रभावी आहे आणि तो श्रीमत भगवद्गीतेवर उभा आहे. माझ्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारीत झालेल्या गोव्याच्या सावरकर साहित्य संमेलनात उपेक्षित समाजघटकांतून जे श्रोते आले होते त्यांची सावरकरभक्ती पाहून मी थक्क झालो. त्यामुळे आध्यात्मिकदृष्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघाने बनविलेली आधुनिक राष्ट्र संकल्पना यांचा संगम घालून तो तत्त्वज्ञानाच्या रूपाने तरुण पिढीसमोर ठेवला, तर पुढच्या तीस वर्षांत हिंदू-मुस्लीम ऐक्यावर समाधानकारक तोडगा निघून पुन्हा अखंड भारत निर्माण होईल, असे मला विश्वासाने वाटते आहे.