'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

महाराष्ट्र, मराठी माणूस आणि स्वाभिमान !


१ मे ! महाराष्ट्र राज्य आज त्याचा ५१ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. केंद्रशासनाच्या भाषावार प्रांतरचनेच्या
धोरणाप्रमाणे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र उदयास येऊन अर्धशतक कधीच पूर्ण झाले. या प्रदीर्घ कालावधीत
मराठी माणूस कोठे आहे, त्याचे देशाच्या राजकीय पटलावरील स्थान काय, याविषयी ऊहापोह करण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या अनुषंगाने जी चळवळ झाली, त्या चळवळीचा मुख्य भाग ‘मुंबईसह महाराष्ट्र’ हा होता. देशाची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले मुंबई शहर महाराष्ट्राला मिळू नये, यासाठी तेव्हाचे केंद्रातील शासन प्रयत्नशील होते, तेव्हाचे काँगे्रसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचा उघड
उघड दुस्वास आणि अपमान केला. मुंबई शहर केंद्रशासित रहावे, असा एकमतप्रवाह होता आणि गुजरात राज्याचा मुंबई शहरावर डोळा होता. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिलेल्या प्रखर लढ्याला अखेर यश येऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली आणि एकाच दिवशी जन्मलेल्या या दोन राज्यांच्या स्थितीत आज जमीन-अस्मानाचा फरक आहे. राज्याच्या विकासाच्या संदर्भात सांगायचे झाले, तर महाराष्ट्राचा कृषीविकास दर २.५ टक्के आहे, तर गुजरात राज्याचा हा दर १३ टक्के आहे. राज्याला आरंभापासून अस्मिताहीन नेते लाभले आणि राज्याची भाग्यरेषा तेथेच स्पष्ट झाली. ‘देशापेक्षा नेहरू मोठे’, असे लाचार शब्द उच्चारणार्‍या नेत्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात आले. या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राची जेवढी म्हणून अवहेलना करायची, तेवढी करून घेतली. दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राला स्थान न देण्याचे तेथील नेत्यांचे धोरण मराठी नेत्यांनी कधी स्वाभिमानाच्या स्तरावर घेतले नाही. एका प्रसिद्ध पत्रकाराने काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते (आता दिवंगत) अर्जुनसिंग यांची भेट घेतली असता, त्यांच्यातील अनौपचारिक चर्चेतून हे स्पष्ट झाले की, ‘मराठी राजकारणी’ दिल्लीश्वरांना नकोच असतो. हा दुस्वास कशासाठी ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील मराठी माणसाची ही अवहेलना का ? छत्रपती नसते, तर आज दिल्लीच्या तख्तावर हे ‘महाराष्ट्राचे विरोधक’ बसू शकले असते का ? भारतातील अन्य सर्व प्रांतांपेक्षा महाराष्ट्र वेगळा आणि थोरल्या भावासारखा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि इतर प्रांतांत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नाहीत, हे आहे ! छत्रपतींच्या उपकारांची फेड करायला आजचे नेते लायक नाहीत, किंबहुना महाराजांचे कार्य लक्षात घेऊन या नेत्यांनी स्वतः कृतज्ञतापूर्वक तसे म्हणायला हवे; परंतु महाराष्ट्राच्या प्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्याऐवजी अधिकाधिक दुस्वास करण्याचे दिल्लीतील नेत्यांनी अंगिकारलेले धोरण अक्षम्य आहे.
मराठी अस्मितेची हाक !
मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण झाला, तरी मराठी भाषिकांचा बेळगाव-कारवार-हुबळी हा भाग कर्नाटक राज्यातून वेगळा करणे महाराष्ट्राला शक्य झाले नाही. आज या प्रदेशातील मराठी भाषिक जनता ज्या यातना भोगत आहे आणि महाराष्ट्रात सामील होण्याच्या क्षणाची ज्या आतुरतेने वाट पहात आहे, त्याला तोड नाही. महाराष्ट्रातील नेते सीमाभागात जाऊन भाषण ठोकण्यापलीकडे काही करत नाहीत. ‘बेळगाव वेगळे दिसते. हा कर्नाटकचा भाग वाटतो,’ असे आमचे साहित्यसम्राट न.चिं. केळकर बोलून बसले आणि आपण बेळगाव गमावले.’ कसोटीच्या वेळी मराठी अस्मिता कशी न्यून पडली त्याचे हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. महाराष्ट्र जसा म्हातारा होत आहे, तशी वादग्रस्त सीमाभागातील मराठी जनताही म्हातारी होत आहे; त्या जनतेला ‘आम्ही महाराष्ट्रातील जनता लवकरच तुमचे महाराष्ट्रात स्वागत करू’, असे सांगणारे नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे. एरव्ही महाराष्ट्रात आज काय आहे ? त्याच्या बरोबरीचे गुजरात राज्य विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या पुढे आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या महाराष्ट्राने काय अनुभवले ? राज्यावर ३ लाख १० सहस्त्र कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. व्याजापोटी २६ सहस्त्र कोटी रुपये द्यावे लागत आहेत. तोट्यातील महामंडळे आणि साखर कारखाने यांच्या हमीपोटी शासनाला सहस्त्रो कोटी रुपये द्यावे लागत आहेत. शेतकर्‍यांची कर्जमाफी, तोट्यातील महामंडळाची कर्जमाफी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आदींसाठी घोषित केलेल्या सहस्त्रो कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’चे नेमके काय झाले, हा प्रश्नच आहे. झोपडपट्ट्यांमध्ये रहाणार्‍यांपैकी २५ टक्के लोकांनाही शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. ६० लाख लोक झोपडपट्टीत रहात असून ‘८१ लोकांमागे एक शौचालय’, अशी दयनीय अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करायला हिंदूंना विरोध केला जातो, हा अन्याय कसा सहन करायचा ? महाराष्ट्राच्या अस्मितेला तळपत ठेवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पोटतिडकीने म्हणत असतात, ‘‘नवा इतिहास घडवणारे आता राहिले कोण ? सगळेच हुजरे दिल्लीत मुजरे झाडत उभे आहेत. शिवरायांचे नाव घेण्याचीही यांची लायकी नाही. महाराष्ट्राने ताठ मानेने आणि मर्दासारखे जगावे. महाराष्ट्रातून निवडून येणार्‍या खासदारांचा आवाज असा बुलंद असला पाहिजे की, तो दिल्ली आणि लोकसभेच्या तख्ताला भिडला पाहिजे. शेळ्यामेंढ्यांसारखे नुसतेच निवडून येऊ नका.’’ आर्थिक घोटाळे आणि स्थावर मालमत्तेची प्रकरणे यांमध्ये स्वतःच गुरफटलेले नेते शिवसेनाप्रमुखांच्या हाकेने थोडेतरी शरमिंदे होतील का ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi