'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

दायित्व असणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

सौ. श्रद्धा पवार
‘सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत चालली असल्याने प्रत्येक दिवशी आपण साधना कशी वाढवू शकतो, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जिल्ह्यात कार्याची घडी बसण्यासाठी आणि साधकांकडून व्यष्टी अन् समष्टी साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी पुढील काही सूत्रांचा अभ्यास करून त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.

१. साधकांना साहाय्य करणे
कार्याच्या दृष्टीने आणि साधनेत येणार्‍या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने साधकांना साहाय्य करण्याचा भाग वाढवू शकतो. साधकांना येणार्‍या अडचणी या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांपैकी कोणत्या स्तरावरील आहेत,
ते पाहून त्या-त्या ठिकाणी कशा प्रकारे साहाय्य करू शकतो, याचा विचार करावा. असे साहाय्य केल्यास उत्तरदायित्व पहाणारा साधक आणि इतर साधक यांच्यात लवकर जवळीक होते.

२. साधकांच्या अडचणी सोडवणे
साधकाच्या कार्यामध्ये आलेली एखादी अडचण आपण सोडवू शकत नसल्यास आपल्या पुढील उत्तरदायित्व पहाणार्‍या साधकाला विचारून घेऊन त्याबाबत सहसाधकांना सांगितल्यास सहसाधकांना दायित्व पहाणार्‍या साधकाचा आधार वाटू लागतो.
 
३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया भावाच्या स्तरावर होण्यास साहाय्य करणे
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना साधकांकडून भावाच्या स्तरावरील प्रयत्नांत वाढ होत आहे कि नाही, याकडे लक्ष देऊ शकतो. यामुळे साधकांमध्ये सकारात्मकता लवकर वाढते.
 
४. त्रास असणार्‍या साधकांकडून उपाय नियमित करून घेणे
वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांकडून उपायांचा भाग नियमित होत आहे कि नाही, याचा आढावा घेण्यास त्रास नसणार्‍या साधकांना सांगू शकतो. त्याप्रमाणे साधकांच्या जोड्या ठरवू शकतो. त्रास असणार्‍या साधकांकडून उपायांचा भाग नियमित झाल्यास त्यांच्या साधनेसाठीच्या प्रयत्नांत वाढ होते.
 
५. व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात १५ दिवसांसाठी एक सूत्र ठरवून घेऊन त्याप्रमाणे प्रयत्न करवून घेणे
जिल्हास्तरावर साधकांकडून प्रयत्नांत वाढ होण्याच्या दृष्टीने प्रत्येक पंधरा दिवसांसाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात एक सूत्र ठरवून घ्यावे. त्याचा पंधरा दिवसांनी आढावा घेतल्यास साधकांचा उत्साह वाढण्यास सहाय्य होईल.
 
६. केवळ कार्याचा नको, तर साधनेच्या प्रयत्नांचाही आढावा घ्यावा
काही जिल्ह्यांत कार्याच्या दृष्टीने नियोजन करण्याकडेच लक्ष अधिक असते. एक कार्य झाले की, लगेच दुसरे पूर्ण करणे होते. यात कार्य करतांना साधकांनी साधनेसाठी किती प्रयत्न केले, याचा आढावा घेण्याचा भाग अल्प असतो किंवा अशा प्रकारे आढावा घेतला जात नाही. असे होत असल्यास उत्तरदायित्व पहाणार्‍या साधकांनी साधनेच्या प्रयत्नांविषयी आढावा घेण्यास आरंभ करावा.
 
७. केवळ भावाच्या स्तरावरील प्रयत्न नको, तर कार्यही व्यवस्थित होणे आवश्यक
काही जिल्ह्यांत भावाच्या स्तरावर प्रयत्न करण्याकडे अधिक लक्ष असते. कार्यातील अडचणी काय आहेत, ते पहाण्याचा भाग अल्प असतो किंवा नसतो. ‘जिल्ह्यात भावाच्या स्तरावरील प्रयत्न चांगले चालू आहेत; परंतु कार्याच्या दृष्टीने किंवा लेखा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अडचणी पुष्कळ येत आहेत’, असे होत असल्यास त्या अडचणी सोडवण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे.’
- सौ. श्रद्धा पवार, मार्गदर्शक सेविका
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi