१. स्वप्नात कोणीतरी दाराची कडी वाजवल्याने दरवाजा उघडणे आणि त्याच वेळी ७ ते ८ अज्ञात व्यक्ती साधिकेला घेऊन घरी येणे : ‘फेबु्रवारी २०११ मध्ये एका रात्री मी झोपले असतांना मला स्वप्न पडले.
त्या स्वप्नात एका साधिकेचा वाढदिवस होता; म्हणून ती बाहेर गेल्याचे मला दिसले. त्यानंतर मी घरी एकटीच होते. थोड्या वेळाने कोणीतरी दाराची कडी वाजवली; म्हणून मी दरवाजा उघडला. त्या वेळी ७ ते ८ अज्ञात व्यक्ती बाहेर गेलेल्या साधिकेला घेऊन घरी आल्या.२. अज्ञात व्यक्तींनी सनातनविषयी धमकीच्या स्वरात विचारणे, त्यांनी संतापून हातातील जड पिशव्यांनी मारण्यास प्रारंभ करणे, त्या वेळी नामजप चालू होणे आणि जड पिशव्या कापसापेक्षाही हलक्या वाटणे : अज्ञात व्यक्ती काही क्षणातच माझ्याभोवती गोल करून उभ्या राहिल्या. त्यांनी मला ‘तुमच्या सनातनवाल्यांचे काय चालले आहे’, असे धमकीच्या स्वरात विचारले. तेव्हा मी त्यांना ‘आम्ही ठिकठिकाणी होणारे देवतांचे विडंबन आणि धर्महानी रोखतो’, असे सांगितले. नंतर त्या सर्वांनी संतापून त्यांच्या हातातील जड पिशव्या माझ्या डोक्यावर मारण्यास प्रारंभ केला. मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच माझे रक्षण करा.’ माझा ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप चालू झाला. त्या वेळी जड पिशव्या मला कापसापेक्षाही हलक्या वाटत होत्या.
३. ईश्वराचे बळ पाठीशी असल्यामुळे मारण्याचा काहीच परिणाम न झाल्याचे अज्ञात व्यक्तीने सांगणे : अज्ञात व्यक्ती मला मारत होत्या; परंतु मला काहीच लागत नव्हते. हे पाहून त्यातील ६ जण पळून गेले. उरलेली एक व्यक्ती मला म्हणाली, `तुमची साधना पुष्कळ चांगली चालू आहे. ईश्वराचे बळ तुमच्या पाठीशी आहे. म्हणूनच आमच्या मारण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही.’
४. साधना करून स्वतःचे जीवन उद्धरण्यास अज्ञात व्यक्तींना सांगणे : मी त्या व्यक्तीला मारले आणि ओरडून बोलले, `हे तुमच्या लक्षात येत आहे ना ! तरीसुद्धा तुम्ही सनातनच्या विरोधात जाऊन स्वतःचे पाप का वाढवून घेत आहात ? त्यापेक्षा साधना करून स्वतःचे जीवन उद्धरून घ्या.’ (स्वप्नातही क्षात्रवृत्ती दाखववून साधिकेने गलितगात्र हिंदूंसमोर एक आदर्श ठेवला आहे. - डॉ. आठवले )
या स्वप्नावरून ईश्वर प्रत्येक क्षणाला आपल्या समवेत आहे आणि तो आपले रक्षण करणारच आहे, ही ठाम श्रद्धा झाली. प.पू. डॉक्टरांनी स्वप्नातसुद्धा आपले रक्षण केले, यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
- कु. सोनम फणसेकर, डोंबिवली