मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयीची वृत्ते वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली; मात्र पुढे काय झाले ? सनातन संस्थेवरील बंदीच्या वृत्तामुळे अभिनव भारत संघटनेवरील बंदीचे सूत्र बाजूला का पडले ?
ज्याप्रमाणे संपूर्ण विधीमंडळाने एकमताने ‘सिमी’वर बंदी घालण्याची मागणी केली, त्याप्रमाणेच सनातन संस्था आणि अभिनव भारत या संघटनांवरील बंदीची मागणी पुढे रेटण्याची आवश्यकता आहे. या सर्व देशद्रोही संघटना आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत केला. (जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांच्या कुकृत्यांमुळे विविध आरोपांच्या पैâरी झडतात तेव्हा तेव्हा जितेंद्र आव्हाड यांना सनातन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर बंदी घालण्याची आठवण येते. जनतेचे लक्ष स्वपक्षियांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून हटवण्यासाठी आव्हाड हा प्रकार करत आहेत, हे सुज्ञांस सांगणे नलगे ! - संपादक)
खिस्ताब्द २०११-२०१२ च्या अर्थसंकल्पातील अनुदानांच्या मागण्यांवर आव्हाड बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘खिस्ताब्द २००६ किंवा २००८ मध्ये मालेगाव येथे झालेले बाँबस्फोट, नांदेड येथे खिस्ताब्द २००२ मध्ये झालेला स्फोट या माध्यमांतून अतिरेकी प्रवृत्ती वाढत आहे. भले ती पाकच्या किंवा नागपूरच्या प्रेरणेतून घडलेली असो. तिच्यामुळे महाराष्ट्र आणि देश यांची अपकीर्ती होत आहे; म्हणून या संघटनांवर योग्य ती कारवाई व्हायला हवी. (निधर्मी पक्षांच्या घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी नेत्यांमुळे महाराष्ट्र आणि देश यांची अपकीर्ती होत नाही का ? त्याविषयी आव्हाड ‘ब्र’ही कसे काढत नाहीत ? - संपादक)
नांदेडच्या स्फोटात वापरलेले पाईप त्यानंतर देशात झालेल्या सर्व ठिकाणच्या स्फोटांत वापरल्याचे आढळून आले आहे. बजरंग दलाने खिस्ताब्द २००४ मध्ये ३०० स्वयंसेवकांना बाँब सिद्ध करून ते कसे फोडावेत, याचे प्रशिक्षण दिले. त्या सर्वाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. एकूणच मालेगावच्या विषयावर स्वतंत्र चर्चेची मागणी आम्ही केली आहे. ती अध्यक्षांनी त्वरित मान्य करावी.’’ अभिनव भारतच्या सौ. हिमानी सावरकर यांनी ‘देशभरात बाँब फोडले पाहिजेत’, असे म्हटले होते. तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही.
(समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यासह अनेक मुसलमान नेते हिंदुविरोधी चिथावणीखोर वक्तव्ये जागोजागी करत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आव्हाड यांनी कधी केल्याचे स्मरत नाही ! - संपादक) सिंहगडाच्या पायथ्याशी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण कोणी कोणाला दिले, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही आव्हाड यांनी केली. या वेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आव्हाड यांना विरोध करत गोंधळ घातला. विरोधक म्हणाले, ‘‘आव्हाडांचा मालेगावचा विषय ऐकून आम्हाला कंटाळा आला आहे.’’