विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना भारतीय क्रिकेट संघाने जिंकला. पंजाब राज्यातील मोहाली येथे खेळवला गेलेला हा सामना पाकचे निमंत्रित पंतप्रधान गिलानी यांनी पाहिला.
पाकचा संघ भारतीय संघाकडून पराभूत होत असतांना गिलानी यांनी पाहिला. गिलानी भारतीय शासनाचे निमंत्रित पाहुणे होते. त्यांना निमंत्रण देऊन बोलावण्यात आले आणि त्यांच्या संघाचा होणारा पराभव त्यांना पहायला लावला, अशी नोंद देशप्रेमी जनता तिच्या दैनंदिन नोंदीमध्ये करू शकते. अर्थात शत्रूदेशाला अशा प्रकारे हिणवण्याचे काम केंद्रातील शासन करू शकत नाही, कारण एका गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करण्याची गांधीगिरी हे त्यांच्या नसानसात भिनलेले धोरण आहे. पाकने भारताच्या विरोधात ओढवून घेतलेले वैर नष्ट करण्यासाठी दोन देशांमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्याचे धोरण सध्या अस्तित्वात आहे. या दोन देशांमध्ये जेव्हा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामना खेळला जाणार असल्याचे नक्की झाले, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकचे पंतप्रधान आणि अध्यक्ष यांना स्पर्धा पहाण्यासाठी मोहाली येथे निमंत्रित केले. अध्यक्ष नाही; पण पंतप्रधान मोहाली येथे पोहोचले आणि स्पर्धा पहाण्यासाठी भारतात येण्याचे निमंत्रण स्वीकारले म्हणून गहिवरून आलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी गिलानी यांचा हात स्वतःच्या दोन्ही हातांत घेऊन त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत केले. भारतीय नेते मागील ६० वर्षे पाकच्या नेत्यांना अशा प्रकारे कुरवाळत आले आहेत आणि पाकबरोबर चार युद्धेही खेळले आहेत. पाकबरोबरचे संबंध नेहमी तणावपूर्ण असतांना भारतीय पंतप्रधानांचे पाकच्या पंतप्रधानांना स्पर्धा पहाण्याचे जे निमंत्रण गेले, त्याचे तेथील प्रसिद्धीमाध्यमांनी कौतुक केले. ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने या निमंत्रणाचे वर्णन ‘शांतीचा छक्का’ असे केले. म्हणजे दोन देशांमध्ये शांतीचे वातावरण निर्माण होण्यासाठी भारताकडून जे प्रयत्न चालू आहेत, त्यांमध्ये मोठी उलथापालथ झाली आणि भारताच्या प्रयत्नांना तोड राहिली नाही, असे या वृत्तपत्राला भासवायचे होते. भारतीय संघाकडून पाकचा संघ पराभूत झाल्यावर आता हा ‘शांतीचा छक्का’ खरोखरच सीमेच्या बाहेर पडतो कि हवेतच रहातो, याकडे भारतीय जनतेचे लक्ष लागले आहे.क्रिकेट डिप्लोमसीचे भूत !
मोहाली येथील क्रिकेटची स्पर्धा पहाण्याचे निमंत्रण पंतप्रधानांनी पाकच्या पंतप्रधानांना दिल्यावर देशप्रेमी भारतियांमध्ये पंतप्रधानांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या. ‘भारताशी हाडवैर’ हा प्रकार पाकमध्ये सर्वांसाठी सारखाच आहे. त्याला पाकचे खेळाडू अपवाद नाहीत. भारताबरोबरची स्पर्धा म्हणजे धर्मयुद्ध असते, असे पाकचे खेळाडूच म्हणतात. भारताबरोबरची स्पर्धा हरल्यानंतर पाकच्या खेळाडूंना पाकमध्ये जगणे मुश्कील होते. अशा वेळी ते पाकचीच नव्हे, तर मुस्लीम जगताची क्षमा मागतात. भारताच्या विरोधात मुसलमानांची एकजुट असावी, हाच त्यामागील उद्देश ! पाकचे खेळाडू भारतीय खेळाडूंवर अपमानास्पद टीका करतात आणि भारतीय चमूच्या विषयी घमेंडखोर वक्तव्ये करतात. या दोन देशांतील क्रिकेट खेळाच्या इतिहासाचा अनुभव अत्यंत दुःखदायक आहे. तरीही भारतीय पंतप्रधान शांतीची कबुतरे पाकच्या दिशेने उडवत असतात. भारतीय संघाबरोबर पाकच्या संघाने कधीच पराजीत होऊ नये, अशी पाकच्या नेत्यांची मानसिकता असते. मोहाली येथील स्पर्धेपूर्वी पाकच्या एका मंत्र्याने त्यांच्या खेळाडूंना ‘मॅचफिक्सींच्या फंदात पडू नका’, असा सल्ला दिला होता. म्हणजे पाकचा संघ हरला, तर जुगारामुळे, भारतीय संघाच्या कर्तृत्वामुळे नाही, अशी हाकाटी देऊन मोकळे व्हायला ते सज्ज ! मोहाली येथील स्पर्धेत भारताच्या सचिन तेंडुलकर याला फलंदाजी करतांना चार जीवदाने मिळाली. हा मॅचफिक्सींचा प्रकार आहे, असा सूर पाकमधून आता निघेल आणि त्या संदर्भात त्यांच्या खेळाडूंची चौकशीही चालू होईल. भारतद्वेषापोटी अशा क्ऌप्त्या पाकमध्ये चालतात, याविषयी जगभरातील देशांना माहिती आहे; पण भारतियांनी त्यासंदर्भात बोलणे हा अपराध आहे. येथे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला आपण दाद दिली पाहिजे. पाकच्या नेत्यांना जेव्हा स्पर्धा पहाण्याचे निमंत्रण देण्यात आले, तेव्हाच पाहुण्यांना खुश करून परत पाठवण्याच्या प्रयत्नांत ‘भारतीय संघाने हार पत्करणारा खेळ करावा’, असे ‘मॅचफिक्सींग’ दिल्लीच्या तख्ताकडून होण्याची भीती वर्तवली गेली होती. या देशाला अनाकलनीय घडामोडी परिचित असल्याने असे काही होणार नाही, असे म्हणता येत नाही. भारतीय संघ जिंकल्याचा आनंद किती जणांना आहे आणि किती जणांना नव्या चिंतेने ग्रासले आहे, ते देवालाच ठाऊक ! ‘क्रिकेट डिप्लोमसी’च्या प्रभावाखाली खेळणारा भारतीय संघ राजकीय ‘मॅचफिक्सींग’ला बळी पडला नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे !
